Pune : ‘मिशन ३२’ मोहीम फत्ते होणार कशी? वाहने ३९ लाख; वाहतूक पोलीस अवघे ९००

Pune : पुण्यातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली आहे. वाहतूककोंडीतून मार्ग काढणाऱ्या पुणेकरांना अक्षरश: जीव मुठीत धरून जावे लागते. कोंडीमुळे होणारे वादावादीचे प्रसंग नित्याचे झाले आहेत. कारवाई करणाऱ्या पोलिसांवर हल्ले होणे, शिवीगाळ करण्याचे प्रकारही घडतात. बेशिस्त वाहनचालक, चौकाचौकांतील अतिक्रमणामुळे कोंडीत भर पडते. शहरातील वाहनांची संख्या वाढत असून, वाहतूक नियोजनाची जबाबदारी फक्त ९०० पोलीस कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे पुण्यातील वाहतूककोंडी सुटणार कशी, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

पुणे शहराचा विस्तार वाढत आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्याचा विस्तार मोठा आहे. शहर आणि जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटीच्या पुढे आहे. रोजगार, तसेच शिक्षणासाठी शहरात वेगवेगळ्या भागांतील नागरिक स्थायिक होण्याचे प्रमाण वाढत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोंदीनुसार शहरात ३९ लाख वाहने आहेत. त्यात दुचाकींचे प्रमाण मोठे आहे. दुचाकींच्या खालोखाल मोटारींची संख्या जास्त असून, वाहन खरेदीचे प्रमाण वाढत आहे. शहराचा वाढता विस्तार, महत्त्वाच्या रस्त्यांवर होणारी कोंडी विचारात घेऊन पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व वाहतूक विभागांची नव्याने पुनर्रचना करण्याचा निर्णय नुकताच घेतला. शहरातील महत्त्वाचे रस्ते, रहदारी विचारात घेऊन वाहतूक विभागांची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरात २८ वाहतूक विभाग आहेत. पोलीस ठाण्यांप्रमाणे वाहतूक विभागाचे कामकाज चालते. वाहतूक विभागातील रस्ते आणि भागांचा विचार करून वाहतूक विभागाची पुनर्रचना करण्यात आली असून, नवीन रचनेनुसार वाहतूक विभागाचे १८ विभागांत कामकाज चालणार आहे.

Mumbai : महापालिकेच्या बोनमॅरो प्रत्यारोपण केंद्रात ३७० बालकांचे बोनमॅरो प्रत्यारोपण!


वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ‘मिशन ३२’ ही माेहीम हाती घेतली आहे. त्यासाठी शहरातील ३२ प्रमुख रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पुणे पोलिसांकडून सर्वसमावेशक सल्लागार समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रमुख रस्त्यांवर वाहतूककोंडी झाली, की शहरातील वाहतूक विस्कळीत होते. त्यामुळे या रस्त्यांवर वाहन लावण्याची व्यवस्था वाहतूक नियंत्रण, चौक सुधारणा अशी विविध कामे केली जाणार आहेत. वाहतूक पोलीस महापालिकेशी समन्वय साधून वाहतूक सुधारणाविषयक कामे करणार आहेत. समितीत लोकप्रतिनिधी, निवृत्त पोलीस अधिकारी, वाहतूक तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार, तसेच खासगी सल्लागार यांचा समावेश असणार आहे. समितीतील सदस्यांचा अनुभव आणि सूचना विचारात घेऊन पोलीस वाहतूककोंडी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत.

एक ऑगस्टपासून ‘मिशन ३२’ या माेहिमेचा प्रारंभ, तसेच वाहतूक विभागाची पुनर्रचनाही करण्यात आली. मात्र, पुनर्रचना आणि मोहीम राबवून शहरातील वाहतूक समस्या आणि कोंडी सुटणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. शहराचा वाढता विस्तार विचारात घेतल्यास वाहतुकीच्या नियोजनाची जबाबदारी वाहतूक शाखेतील ९०० कर्मचाऱ्यांवर आहे. ९०० कर्मचाऱ्यांच्या बळावर संपूर्ण शहरातील वाहतुकीचे नियोजन करणे तसे अशक्य आहे. शहर, तसेच उपनगरातील प्रमुख चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे वाहतूककोंडी, तसेच नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईपुरते ठीक आहेत. मात्र, कोंडी सोडविण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरूनच काम करावे लागणार आहे, याचादेखील विसर पडता कामा नये. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे शहरातील वाहतूक समस्या सुटणार नाही. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे लागणार आहेत. चौकाचौकांत झालेल्या अतिक्रमणावर कारवाई करावी लागणार आहे.


महापालिका, पुणे महानगर विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्तेविकास महामंडळ अशा यंत्रणांशी समन्वय साधून पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागणार आहे. पुण्यातील वाहतूक समस्या एखादी योजना राबवूनही सुटेल, याची हमी देणे योग्य ठरणार नाही. आजमितीला अनेकजण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यापेक्षा खासगी वाहनांचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत. मेट्रो, पीएमपी सेवेकडे अधिकाधिक नागरिक कसे वळतील याचाही विचार करणे गरजेचे आहे.

रस्त्यावर प्रत्यक्ष उभे राहून वाहतूक नियंत्रण करणे तितके सोपे नाही. बेशिस्त वाहनचालकांचे चौकाचौकांत पोलिसांशी वाद होतात. कारवाई केल्यानंतर प्रकरण हमरीतुमरीवर जाते. वाहतूक पोलिसांना शिवीगाळ केली जाते. पोलिसांकडून अरेरावी केली जात असल्याच्या तक्रारी होतात. वाहनचालकांमध्येही आपसात वाद होतात. त्याचे पर्यवसान हाणामारीत होते. एकंदरच पुण्यात वाहन चालविणे अवघड बनले आहे. कधी काय घडेल, याचा नेम नाही. अरुंद रस्त्यांवरील कोंडी, वाद असे प्रसंग वाहनचालकांना रोजच अनुभवायला मिळतात. वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिसांना पाठबळ देणे गरजेचे आहे. वाहतूक शाखेतील मनुष्यबळ वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना गृह विभागाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. मनुष्यबळ वाढविण्याबरोबरच रस्त्यावर उभे राहून काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या मागे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. वाहतूक पोलिसांचे मनोधैर्य वाढविल्यास काही अंशी शहरातील वाहतूक समस्या सुटण्यास मदत होईल. नाहीतर योजना, मोहिमा कागदावरच राहतील…



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply