Loksabha Election 2024 : विद्यमान खासदारांना नकार, शिंदे गटाला पडणार महागात

Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाने तत्कालीन शिवसेनेच्या विरोधात केलेल्या ऐतिहासिक बंडाने भल्याभल्यांचे धाबे दणाणले होते. तत्कालीन शिवसेनेच्या १८ पैकी तब्बल १३ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाची वाट धरली होती. आत्तापर्यंत तब्बल तीन विद्यमान खासदारांना शिंदे यांनी घरचा रस्ता दाखवला आहे.

यातील हिंगोली, यवतमाळ - वाशिम विद्यमान खासदारांना पक्षांतर्गत संघर्ष व भाजपचा स्थानिक पातळीवरील विरोध व भाजपने केलेले सर्वेक्षण अडचणीचे ठरल्याची माहिती मिळत आहे. मात्र या निर्णयाचा फटका शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

IPL 2024: पंजाब किंग्सचा रचला इतिहास, आजपर्यंत जगातील कोणत्याच संघाला न जमलेला केला पराक्रम

यवतमाळ - वाशीमवर गेली २५ वर्षे ठाण मांडून बसलेल्या भावना गवळी यांना शिंदे गटाने उमेदवारी नाकारल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्याचा धक्का बसला. उमेदवारी का नाकारली गेली, याचा आढावा घेतला असता मतदारसंघातील चार भाजप आमदारांचा गवळी यांना विरोध असल्याचे समोर आले.

त्यातच भाजपचे आमदार मदन येरावार यांनी आणलेल्या ३५० कोटींच्या अमृत योजनेची योग्य अंमलबजावणी न झाल्याने गवळी यांनी संसदेत आवाज उठवला होता. त्याचाच राग मनात धरून योग्यवेळी भाजप आमदारांनी गवळींच्या उमेदवारीवर टाच आणण्याचे प्रयत्न केले.

त्याचबरोबर भावना गवळी यांचे पक्षातील सहकारी मंत्री संजय राठोड यांच्याबरोबरही यवतमाळच्या नेतृत्वावरून वाद असल्याने उमेदवारी न मिळण्यात राठोड यांचीही आडकाठी होती, असे समजते. शिंदे गटाचा अंतर्गत वाद, भाजप नेत्यांचा विरोध, भाजपचे सर्वेक्षण यामुळे गवळी यांची विकेट गेली असल्याची माहिती यवतमाळच्या शिंदे गटातील वरिष्ठ नेत्याने ‘सकाळ’शी बोलतांना दिली.

त्याबरोबरच हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांनाही मतदारसंघातील भाजपच्या चार आमदारांनी विरोध केला होता. मराठा आरक्षणासाठी दिल्लीला आंदोलन करणे, पक्षाच्या विरोधात राजीनामा देणे व अंतर्गत सर्वेक्षण, या सर्व गोष्टी उमेदवारीसाठी पाटील यांना अडथळा ठरल्याचे समजते. या दोन्ही उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वावरच विरोधकांनी व पक्षातील नेत्यांनी प्रश्नचिन्ह उभा करण्यास सुरुवात केली आहे.

याचा राजकीय फटकाही शिंदे यांना बसणार आहे. शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून पुढच्या राजकीय भवितव्याचा विचार न करता हे १३ खासदार व चाळीस आमदार शिंदेंसोबत आले. मात्र तीन विद्यमान खासदारांची तिकिटे कापल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतही उमेदवारी नाकारली जाईल, अशी भीती शिंदे गटाच्या आमदारांमध्ये पसरली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांना होणारा तोटा ...

  • शिंदे यांच्या नेतृत्वावरच प्रश्न

  • शिंदे गट भाजप चालवतात असा विरोधक प्रचार करणार

  • अनेक आमदारांमध्ये अस्वस्थता

  • भाजपने लोकसभेला तीनशे पार केल्यास गटाला डावलले जाण्याची भीती.

  • अनेक कार्यकर्ते पुन्हा ठाकरे गटाकडे फिरण्याची शक्यता .



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply