Kasaba Byelection Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

पुणे - कसबा विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच, विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यात मनाई करण्यात आली आहे. या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे आदेश पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी जारी केले आहेत.

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता. २) कोरेगाव पार्क भागातील अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात (एफसीआय गोडाऊन) होणार आहे. मतमोजणी केंद्र परिसरात शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलिस, संरक्षण दल, कारागृह विभाग, बँक सुरक्षा विभाग तसेच केंद्रीय आणि राज्य सरकारी अधिकारी यांना हा आदेश लागू राहणार नाही. मतमोजणी केंद्र परिसरात मोबाईल संच, बिनतारी दूरध्वनी (कॉर्डलेस फोन) वापरण्यास मनाई असेल.

राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. दोन मार्च रोजी पहाटे एक वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे आदेश लागू राहतील, अशी माहिती पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली.

मतमोजणी केंद्र परिसरात कोणताही मजकूर प्रदर्शित करण्यास मनाई आहे. शासकीय वाहने सोडून अन्य वाहनांना या परिसरात प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच, मतमोजणी केंद्रात वैध पास असलेल्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply