Kalyan News : कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यात दाखल होणार युद्धनौका, स्वागताची जय्यत तयारी

Kalyan News : भारतीय नौदलात 23 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेली युद्धनौका कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याजवळील स्मारकात विराजमान होणार आहे. या युद्धनौकेचा प्रवास आज सुरू झाला आहे. कल्याण स्मार्ट सिटीचे अधिकारी या नौकेचे स्वागत करणार आहेत. मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी या नौकेचे कल्याणमध्ये भव्य स्वागत केले जाणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्या मराठा आरमाराची उभारणी केलेल्या कल्याणच्या दुर्गाडी बंदरात पुन्हा एकदा इतिहासाची उजळणी होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी इतिहासाला अभिवादन करण्यासाठी कल्याणच्या उल्हास नदीकिनारी नेव्हल गॅलरीच्या रूपात हेरिटेज कॅम्पस उभारण्याची कल्पना कल्याणचे माजी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंश यांची कल्पना होती.

त्यांच्या पश्चात ही कल्पना साकरण्यासाठी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे हे काम करीत आहेत. भारतीय नौदलाची युद्धनौका टी-८० दुर्गाडी कल्याण येथे स्मारक स्वरूपात विराजमान करण्यासंदर्भात भारतीय नौदल आणि एसकेडीसीएल यांच्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात सामंजस्य करार झाला होता. यानंतर कल्याणच्या खाडीकिनारी या युद्ध नौकेसाठी स्मारक उभारण्याचे काम सुरु असतानाच नौदलाने ही नौका कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

आज मुंबईतील कुलाबा येथील नौसेना डॉक यार्डमधून ही युद्धनौका नौसेनेमार्फत महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, माजी महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नौदलाचे रिअल ऍडमिरल ए एन प्रमोद, कमोडर जिलेट कोशी यांनी एसकेडीसीएलच्या माध्यमातून महापालिकेकडे सुपूर्द केली.

या युद्ध नौकेचे कुलाबा येथून जलमार्गाने कल्याण दुर्गाडी येथे दोन दिवसात आगमन होणार आहे. किल्ले दुर्गाडी येथे नदीकिनारी विकास प्रकल्पातील आरमार स्मारकाचा भाग म्हणून या युद्धनौकेचे जतन केले जाणार आहे.

टी-८० युद्ध नौकेचा इतिहास

भारतीय नौदलातील अतिजलद माऱ्यासाठी प्रसिद्ध असलेली टी-८० ही युद्धनौका ७ ऑक्टोबर २१ रोजी २३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाली. इस्त्रायल येथे मेसर्स आयएआय रामता यांनी बांधलेली ही युद्धनौका २४ जून १९९८ रोजी भारतीय नौदलात कार्यान्वित करण्यात आली होती.

हे जहाज विशेषतः उथळ पाण्याच्या ऑपरेशनसाठी तयार करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या किनारपट्टीला सुरक्षा प्रदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेगाने गस्त घालण्यात ही युद्धनौका कायम तत्पर होती. या नौकेचे स्मारक उभारून पुढील पिढीसाठी भारतीय नौदलाची महती सांगत ही नौका देश सेवा करत राहणार आहे.

ही नेव्हल गॅलरी प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत राज्याचा समृद्ध सागरी इतिहास दर्शवेल. सार्वजनिक प्रदर्शनात मराठ्यांच्या तसेच भारतीय नौदलाच्या अनेक प्रेरणादायी घटना चित्रे, शिल्पे, कलाकृती आणि मल्टिमिडीयाच्या रूपात मांडले जातील.

नियोजनाच्या टप्प्यापासूनच हा प्रकल्प भारतीय नौदलातील अधिकारी आणि अभ्यासकांच्या सक्रिय सहभागासह विकसित केला गेला आहे. भारतीय नौदल आणि एसकेडीसीएल यांच्यातील सहकार्यामध्ये विविध कमांड्सला अभ्यास दौरे, अभिलेखीय ऐतिहासिक सामग्रीची देवाणघेवाण आणि आता खुद्द टी-८० युद्धनौकेचे कायमस्वरूपी प्रदर्शन यांचा समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply