Jivdhan Fort : पुणे परिसर दर्शन : दोन हजार वर्षांपूर्वीचा जीवधन किल्ला- नाणेघाट

साधारण दोन हजार वर्षांपूर्वी समुद्रामार्गे होणारा व्यापार नाणेघाट या मार्गाने कल्याण ते नगर आणि जुन्नर या ठिकाणी होत असे. या मार्गावर करवसुलीसाठी घाटात एक गुहा खोदली असून, जवळच एक प्रचंड मोठा दगडी रांजण आहे. त्यात जकातीची नाणी गोळा केली जात होती, असं म्हटलं जात होतं आणि म्हणून याला ‘नाणेघाट’ असं नाव पडलं असावं, असा समज होता; पण नंतर झालेल्या संशोधनाप्रमाणे हा समज चुकीचा होता, हे सिद्ध झालं आहे.

ज्या डोंगराच्या कड्यात गुहा खोदली आहे, त्याला ‘नानाचा अंगठा’ असे म्हणतात. त्या गुहेत सातवाहन राजा ‘सातकर्णी’ याची राणी ‘नागनिका’ हिने काही यज्ञ आणि होम केल्यानंतर दान दिल्याची माहिती ब्राह्मी लिपीमध्ये कोरली आहे. सातवाहन राजांचा काळ साधारण इसवी सन पूर्व २०० ते इसवी सन २०० असा आहे. नाणेघाटातील व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि मार्ग सुरक्षित करण्यासाठी मध्ययुगीन काळात जीवधन हा किल्ला बांधला असावा.

सोळाव्या शतकात निजामाविरुद्ध मुघल आणि आदिलशहा असा संघर्ष सुरू असताना निजामाचा एकमेव वारसदार ‘मूर्तजा’ याला मुघलांनी या किल्ल्यावर बंदिवासात ठेवले होते. हा साधारण एक वर्षाचा असताना शहाजीराजांनी त्याला निजामाच्या गादीवर बसवून स्वतः वजीर म्हणून निजामाचा राज्यकारभार चालवला होता.

- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक

काय पहाल

नाणेघाट - नाणेघाटातील गुहा, त्या गुहेच्या तिन्ही भिंतींवर असलेला ब्राह्मी लिपीतील शिलालेख, गुहेजवळ असलेला प्रचंड दगडी रांजण, त्याच्यासमोरच असलेलं ‘गजलक्ष्मी’ हे छोटेखानी शिल्प, नानाच्या अंगठ्याच्या टोकावरून दिसणारे कोकणचे दृश्य.

जीवधन - किल्ल्यावर जाण्यास दोन वाटा आहेत. पूर्वेची वाट शिड्या लावून सोपी केली आहे, पश्चिमेच्या वाटेवर छोटे कातळ टप्पे आहेत. एक दरवाजा, पाण्याची टाकी, अर्धे बांधीव आणि अर्धे खोदीव असे धान्य कोठार, जीवबाबाई देवीच्या मंदिराचे भग्नावशेष, वरुंडवान, किल्ल्याच्या पश्चिमेकडे जवळच असलेला वानरलिंगी / खडा पारशी सुळका.

पायथ्याचे गाव - घाटघर.

तालुका - जुन्नर.

पुण्यापासून अंतर - १२५ किमी.

कसे पोहचाल

पुण्यापासून जुन्नरला एसटीने जाऊन जुन्नरहून पुढे एसटी किंवा जीपने जाता येते. पायथ्याला जेवण व राहण्याची सोय होते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply