INS Vikrant : आयएनएस विक्रांतला सामर्थ्य पुण्यातील उद्योगांचे

पुणे : भारतीय नौदलाचे सामर्थ्य अधोरेखित करणारी ‘आयएनएस विक्रांत’ ही युद्धनौका आता कार्यान्वित झाली आहे. संपूर्णतः भारतीय बनावटीची ही युद्धनौका तयार करण्यामध्ये पुणे परिसरातील काही मोठ्या उद्योगांबरोबरच लघुउद्योगांचाही हातभार लागला आहे. युद्धनौकेवर सुसज्ज रुग्णालय, स्वयंपाक घर, सुरक्षिततेसाठी नौकेला रंगविण्यासाठी स्प्रे पेंट, इनपुट डिव्हायसेस आणि कम्युनिकेशनसाठीची सिस्टिमही पुणे परिसरातच तयार झाली आहे. निविदा प्रक्रियेत परदेशी कंपन्यांशी स्पर्धा करून स्थानिक कंपन्यांनीही ‘हम किसीसे कम नही’ हे दाखवून दिले आहे.

विमानवाहू आयएनएस विक्रांत ही युद्धनौका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन सप्टेंबर रोजी भारतीय नौदलात दाखल झाली. कोचीन शिपयार्डने तिची निर्मिती केली आहे. गेल्या १३ वर्षांत टप्प्याटप्प्याने या युद्धनौकेची बांधणी झाली. त्यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपये खर्च आला आहे. आता ही युद्धनौका कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार झाली आहे. भारतात भारताने तयार केलेली ही युद्धनौका साकारण्यासाठी अमेरिका, इस्राईल, रशिया यांचीही काही प्रमाणात मदत घेण्यात आली तसेच देशातील १०० हून अधिक लहान-मोठ्या उद्योगांनीही या युद्धनौकेसाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे यंत्रसामग्री पुरवली आहे. त्यात पुणे परिसरातीलही काही उद्योगांचा समावेश आहे. त्यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधल्यावर ‘विक्रांत’ घडण्याची प्रक्रिया उघड झाली.

सुसज्ज रुग्णालय अन् स्वयंपाक घर
या युद्धनौकेवर ४२ कंपार्टमेंटचे सुसज्ज रुग्णालय, सुमारे दोन हजार सैनिकांसाठीचे आधुनिक स्वयंपाक घर, लाँड्री तयार करणारे ‘सुषमा मरिन सोल्युशन्स’चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश बेहरे म्हणाले, ‘‘आम्ही उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर, एक्स-रे, सिटीस्कॅन आदी सुविधा आहेत. दंतोपचारांचीही सुविधा आहे. पोळ्या, इडली, डोसा आदी खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी आधुनिक मशिन्स तयार केली आहेत. तसेच लॉन्ड्रीसाठीही नवे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.’’ नौदलाच्या १०० पेक्षा जास्त जहाजे, बोटींसाठी यापूर्वी यंत्रसामग्री पुरवली आहे. सुमारे १०० कोटींची ही निविदा आम्ही केवळ गुणवत्तेच्या आधारे परकीय कंपन्यांशी स्पर्धा करून मिळवून वेळेत काम पूर्ण केले, याचा अभिमान वाटतो. त्यामुळे देशाचे ७० कोटीपेक्षा जास्त रकमेचे परकीय चलन आम्ही वाचवू शकलो, असेही त्यांनी सांगितले. बेहरे यांचा तळेगाव आणि खोपोली येथे कारखाना आहे.

७०० कम्युनिकेशन स्टेशन्स
ऑडिओ कम्युनिकेशन सिस्टीम, अनाउन्समेंट, इंटरकॉम क्षेत्रातील फाय ऑडिओ कॉम सिस्टीमचे व्यवस्थापकीय संचालक चंद्रशेखर भावे म्हणाले, ‘‘या युद्धनौकेवर आम्ही ७०० कम्युनिकेशन स्टेशन्स उभारली असून २२ इंटरकॉम दिले आहेत, तर तीन हजार ध्वनिवर्धक बसवले असून ६० ऍम्प्लिफायर पुरविले आहेत. या युद्धनौकेतील अंर्तगत संदेश वहन व्यवस्था आम्ही उभारली आहे. युद्धनौकेत १४ मजले असून तेथे ही व्यवस्था असून सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांना तिचा दैनंदिन वापर करता येणार आहे.’’ तसेच युद्धनौकेचे दैनंदिन कामकाजही या सिस्टीमवर अवलंबून आहे, अशी माहिती त्यांनी दिली. नौदलाच्या ७० नव्या तर सुमारे ३० जुन्या विविध प्रकारच्या जहाजांना कम्युनिकेशन सिस्टीम भावे यांनी पुरवली असून सुमारे १० कोटींचा प्रकल्प त्यांनी चार वर्षात पूर्ण केला आहे.

नौकेतील १४ मजल्यांना कोटिंग
‘विक्रांत’ तयार झाल्यावर तिला रंग देण्यापूर्वी तीन प्रकारचे ‘कोटिंग’ करावे लागते. त्यासाठीचे ऑटोमॅटिक न्यूमॅटिक स्प्रे पेंटिंग पंप भोसरीतील व्ही. आर. कोटिंग या कंपनीने तयार केले आहेत. खारे पाणी आणि विविध प्रकारची रसायने किंवा कोणत्याही प्रकारचे तैलजन्य पदार्थांचा नौकेच्या आवरणावर परिणाम होऊ नये, यासाठी कोटिंग करावे लागते. तसेच नौकेतील १४ मजल्यांवर आणि मशिनरूममध्येही अंतर्गत कोटींगसाठी कंपनीने खास तयार केलेले ७५ न्यूमॅटिक पंप वापरले गेले आहेत, असे कंपनीचे जनरल मॅनेजर

अनिरुद्ध दिघे यांनी सांगितले. ही कंपनीदेखील गेल्या २० वर्षांपासून नौदलासाठी काम करते.

तापमान नियंत्रणासाठी कंट्रोल पॅनेल
युद्धनौकेचे इंजिन आणि तेथील यंत्रसामग्रीचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीचे कंट्रोल पॅनेल भोसरीतील सिमट्रॉनिक्स ऑटोमेशन या कंपनीने पुरविले आहेत. गोदरेजच्या लोखंडी कपाटाएवढे मोठे एक कंट्रोल पॅनल असते. असे चार पॅनेल युद्धनौकेवर पुरविण्यात आले आहेत, अशी माहिती कंपनीचे अधिकारी जयंत देशपांडे यांनी दिली. युद्धनौकेवरील हजारो उपकरणांसाठी इनपुट डिव्हायसेस कोथरूड इंडस्ट्रिअल इस्टेटमधील किट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने अप्रत्यक्षपणे पुरविले आहेत. सुमारे ३० वर्षांपासून ते लष्कराला विविध प्रकारचे इनपुट डिव्हायसेस पुरवितात, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुलकर्णी यांनी दिली.

संरक्षण क्षेत्र आणि खासगी क्षेत्र यांच्यामध्ये सहकार्य वाढत आहे, ही चांगली बाब आहे. त्याचा फायदा मोठ्या उद्योगाबरोबरच लघुउद्योगांनाही होत आहे. परदेशातील कंपन्यांच्या उत्पादनांना तोडीसतोड उत्पादन भारतीय कंपन्या देऊ लागल्या आहेत. खऱ्याअर्थाने भारत आता आत्मनिर्भर होत आहे, याचा आनंद वाटतो.
- अशोक सुभेदार, व्हाइस ॲडमिरल (निवृत्त)

‘विक्रांत’साठी पुण्यातील उद्योगांचा वाटा
- सुसज्ज रुग्णालय, आधुनिक स्वयंपाक घर, लॉंड्री
- युद्धनौकेवरील अंतर्गत कम्युनिकेशन, अनाऊन्समेंट सिस्टीम
- कोटिंगसाठीचे न्यूमॅटिक स्प्रे पेंट पंप
- यंत्रसामग्रीचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीचे कंट्रोल पॅनेल
- हजारो उपकरणांसाठी इनपुट डिव्हायसेस

विक्रांत युद्ध नौका -
- वजन ४५ हजार टन
- खर्च २० हजार कोटी
- १६०० सैनिकांची निवास व्यवस्था
- २६२ मीटर लांब, ५९ मीटर रुंद
- १४ मजली उंच
- ५६ किलोमीटर ताशी वेग

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply