विश्वासदर्शक ठराव: ‘सेना-भाजपा युतीचं सरकार’ असा उल्लेख करत फडणवीसांकडून शिंदेंचं अभिनंदन;

शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. १६४ विरुद्ध ९९ मतांनी शिंदेंनी हा ठराव जिंकलाय. शिंदे यांच्या विजयानंतर सभागृहामध्ये बोलाताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला. यावेळी फडणवीस यांनी शिंदे यांचा उल्लेख करताना ‘शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्री’ असा केलाय. यानंतर भाजपा आणि शिंदे गटाच्या आमदारांनी, ‘शिवसेना भाजपा युतीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.

“एकनाथ शिंदे यांच्यावर प्रचंड मोठा विश्वास व्यक्त केला म्हणून शिंदेंचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या सदस्यांनी या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं त्यांचे अभार तर मानतोच पण ज्या सदस्यांनी अप्रत्यक्षपणे प्रचंड मतांनीनी पारित व्हावा यासाठी बाहेर राहून मदत केली त्यांचेही आभार मानतो,” असं फडणवीस यांनी म्हटलं. त्यानंतर सत्ताधारी आमदारांनी बाकं वाजवून या वक्तव्यावर आनंद व्यक्त केला. अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, झिशान सिद्दीकी, धीरज देशमुख हे नेते आज विश्वास दर्शक ठरावाच्या दिवशी सभागृहात अनुपस्थित होते.

अनेक सदस्य अनुपस्थित असल्याने विरोधी बाकांवरील आमदारांची विश्वासदर्शक ठरावातील संख्या तिहेरी आकड्यापर्यंतही पोहचू शकली नाही. सभागृह ११ वाजता सुरु झालं. पण काँग्रेसचे चार सदस्य उशिरा आले. सभागृहामध्ये प्रवेश देण्याची वेळ संपल्याने त्यांना सभागृहात प्रवेश देण्यात आला नाही. या आमदारांबरोबरच प्रणिती शिंदे, जितेश अंतापुरकर काल ही अनुपस्थित होते आज ही अनुपस्थित आहेत. जितेश अंतापूरकर यांचे लग्न असल्याने ते अनुपस्थित तर प्रणिती शिंदे या परदेशी असल्याने त्या सभागृहात आल्या नाहीत.

“एकनाथ शिंदे हे कट्टर शिवसैनिक, बाळासाहेबांच्या जाजवल्य विचारांचे पाईक आहेत. ते एक कुशल संघटक आणि जनतेचे सेवेकरी आहेत. १९८० पासून शाखाप्रमुख ते पुढे येत वेगवेगळी पदं भुषवली आहेत. १९८४ मध्ये किसननगर शाखाप्रमुख दिघेसाहेबांच्या नेतृत्वात अनेक आंदोलनात सहभाग घेतला. दिघेसाहेबांनी आदेश दिला की आपलं सर्वस्व सोडून, आपल्या जीवाची पर्वा न करता ते गरजवंतांसाठी ते हजर असायचे. अडचणीच्या काळात छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रशासनाविरोधात आंदोलन उभं करुन सामान्यांना न्याय देण्यासाठी ते लढले,” असं फडणवीस पुढे शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव करताना म्हणाले.

“२००४ पासून सलग चार वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले. मागच्या काळात मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्याहून महत्वाचं म्हणजे त्या काळात सीमाप्रश्नावर जे काही आंदोलन झालं त्या आक्रमक आंदोलनात एक नेता म्हणून दबदबा निर्माण केला. १९८६ साली त्यांनी सीमाप्रश्नावरील आंदोलनामध्ये सक्रीय सहभाग घेतला. ४० दिवस बेल्लारीच्या तुरुंगात सीमाप्रश्नासंदर्भात कारावास भोगला आणि त्यातून एक मोठं व्यक्तीमत्व तयार झालं. १९९७ साली ठाण्यात नगसेवक, मनपा सभागृह नेते, आमदार, जिल्हाप्रमुख झाले. आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत,” असं फडणवीस म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply