पुणे : वेरूळच्या गिलाव्यात गहू आणि गांजा – डॉ. मिलिंद देसाई

पुणे : वेरूळच्या प्राचीन गुहांमधील टिकाऊ आणि मजबूत गिलाव्याचा अगदी चीनपासून अमेरिकेपर्यंत वापर केल्याचे दिसते. हा गिलावा दीर्घकाळ टिकावा यासाठी प्राचीन भारतीय कलाकारांनी मध्य पूर्वेकडील गांजा आणि गहू या वनस्पतींच्या पानांचा वापर केला होता, अशी माहिती वनस्पतीशास्र विषयाचे प्राध्यापक डॉ. मिलिंद देसाई यांनी पुढे आणली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील प्राध्यापकांच्या सावित्रीबाई फुले शिक्षक संघटनेतर्फे ‘शैक्षणिक संवाद’ उपक्रम आयोजित केला जातो. यात प्रा. सरदेसाई यांनी ‘‘वेरूळच्या भिंतींच्या गिलाव्यामधील रहस्ये’’ या विषयावर व्याख्यान दिले. ते म्हणाले,‘‘वेरूळ म्हणजेच प्राचीन काळी एलगंगा नदीच्या काठी वसलेलं एलापूर. हे ठिकाण एकजिनसी दगडातून खोदलेल्या गुंफाशिल्पांसाठी प्रसिद्ध आहे. या गुंफांच्या भिंतींच्या गिलाव्याचं संवर्धन करताना तो कशापासून बनवला आहे. असा प्रश्न पुरातत्त्वज्ञांना पडला होता. त्यावेळी या गिलाव्यातील काही भागाचं पृथक्करण केल्यावर त्यात वनस्पतींचे अंश मिळाले.

त्यांचा अभ्यास केल्यावर या गिलाव्याला घट्टपणा यावा, ओल नसावी आणि रोगप्रतिकारक गुणांमुळे तो दीर्घकाळ टिकावा यासाठी गांजा आणि गहू या वनस्पतींच्या पानांचा वापर केल्याचे लक्षात आलं. त्यातही या झाडांमधील नर प्रजातीपेक्षा मादी प्रजातींच्या पानांत हे गुण अधिक होते. म्हणूनच गिलाव्यासाठी खास लागवड करून या वनस्पतींचा वापर करण्याइतके प्रगत ज्ञान या कलाकारांकडे होते. भारतच नव्हे तर प्राचीन काळात या वनस्पतींचा वापर टिकाऊ आणि मज़बूत गिलाव्यासाठी चीनपासून अमेरिकेपर्यंत अनेक ठिकाणी केला जात होता.’’ विविध शैक्षणिक विषयांवर विभागांमधील प्राध्यापक सहकारी चर्चेसाठी एकत्र आणणं हाच कार्यक्रमाचा हेतू असल्याचं डॉ. श्रद्धा कुंभोजकर यांनी संयोजकांच्या वतीनं सांगितले.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply