पुणे महापालिकेचे अधिकारी ऑनलाइन तक्रार परस्पर बंद करून करताहेत नागरिकांची फसवणूक

पुणे - रस्त्याला पडलेले खड्डे, कचरा, अपुरा पाणी पुरवठा, बांधकाम व्यावसायिकाकडून होणारी चुकीचे कामे यासह अनेक तक्रारी महापालिकेच्या वॉट्सॲप, ट्विटर, फेसबुकवर येतात. त्याची दखल घेऊन ही तक्रार संबंधित विभागाला पाठवून त्याचे निरसन करणे आवश्‍यक आहे. मात्र, महापालिकेचे अधिकारी तक्रारीचे निवारण न करताच परस्पर ती तक्रार सोडविल्याचे सांगून बंद करून टाकत असल्याचा अनुभव पुणेकरांना वारंवार येत आहे. एकीकडे स्मार्ट कारभार सुरू असल्याचे महापालिका भासवत असताना प्रत्यक्षात अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची फसवणूक करत आहेत.

पुणे महापालिकेत दाखल झालेली समाविष्ट गावे, वाढणारी लोकसंख्या, बांधकामे यामुळे प्रशासनाला अपुऱ्या मनुष्यबळावर काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील समस्या स्थानिक अधिकारी, कर्मचारी यांना निदर्शनास आल्या नाहीत म्हणून त्या तशाच राहू नये. नागरिकांच्या समस्या निदर्शनास आल्यास त्यांनी त्याबाबत महापालिकेकडे तक्रार करावी व महापालिकेकडून त्या दूर करण्यासाठी लगेच कार्यवाही होईल यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी महापालिकेने सोशल मिडियाचा वापर सुरू केला. पुणे महापालिकेने फेसबुक, ट्विटर, वॉट्सॲपवरून नागरिकांच्या तक्रारी घेण्यास सुरवात केली. त्यामध्ये ट्विटर, फेसबुकला नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. आपल्या भागातील छोट्यामोठ्या समस्यांचे फोटो व ठिकाणासह तक्रारी केल्या जात आहेत.

महापालिकेच्या हँडलला फोटो फेसबुकवर किंवा ट्विट केल्यानंतर त्यावर तुमच्या तक्रारीची दखल घेतली आहे. या तक्रारीचा हा टोकण क्रमांक असून, तक्रार निवारणासाठी ती संबंधित विभागाकडे पाठवून देण्यात आली आहे. टोकन क्रमांकावरून ती ट्रॅक करता येईल असे उत्तर नागरिकांना दिले जाते. तक्रारीची लगेच दखल घेतल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जाते. पण पुढे काही दिवस झाले तरी समस्या जशी आहे तशीच राहते. कचरा उचलला जात नाही, खड्डे बुजविले जात नाही, रस्‍त्यावरील अतिक्रमण, अपुरा पाणी पुरवठा, पादचारी मार्गाची झालेली तोडफोड, अवैध बांधकाम यावर कोणतीही कारवाई होत नाही. पण नागरिकांना तुमच्या तक्रारीचे निवारण झाले आहे असा रिप्लाय करून तक्रार बंद केली जाते. अनेकदा तर तक्रारदाराला कोणतीही माहिती न देताच तक्रार बंद झाल्याचेही निदर्शनास आले आहे.

धाक नसल्याने बेफिकीरी

ट्विटर, फेसबूक, वॉट्सॲपवरील तक्रारी आल्यानंतर त्याची कारवाई केली की नाही हे तपासण्याची कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे नाही. नागरिकांनी वैतागून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार पाठविल्यानंतर मग अधिकारी, कर्मचारी कामाला लागतात. पण इतर वेळी कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कोणताही धाक नसल्याने त्यांच्याकडून बेफिकीरी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांकडून पुन्हा सोशल मिडियावर महापालिकेच्या कामाच्या पद्धतीवर टीका केली जात आहे.

‘बिबवेवाडी येतील साईशिल्प कुकडे सोसायटी परिसरात भर रस्त्यात फक्त झाडाचे खोड राहिले आहे. ते वाहतुकीसाठी चालणाऱ्यांसाठी धोकादायक असल्याने त्याची तक्रार करून उरलेले खोड काढून घ्यावे अशी तक्रार केली होती. पण अनेक आठवडे उलटून गेले तरीही ते खोड काढले नाही आणि आम्ही केलेली तक्रार बंद करून टाकण्यात आलेली आहे. महापालिकेकडून वारंवार हा अनुभव येत आहे. महापालिका आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालून तक्रारींचा आढावा घेणे आवश्‍यक आहे.’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply