पुणे महापालिका निवडणूक : अंतिम मतदार यादीची प्रतीक्षा ; मतदार संख्येतील गोंधळामुळे यादीला विलंब

पुणे महापालिका निवडणूक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत संपुष्टात आल्यानंतरही महापालिकेच्या निवडणूक शाखेला अद्याप यादी जाहीर करता आलेली नाही. सहा प्रभागांमधील मतदारसंख्येबाबत घोळ कायम राहिल्याने यादी जाहीर करण्यास विलंब लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगामी महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर केली. त्यावर हरकती सूचना मागविण्यात आल्यावर प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणावर आक्षेप आल्याने अंतिम मतदार यादी जाहीर करण्यास दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार गुरुवारी (२१ जुलै) यादी जाहीर करण्याचे आदेश होते. या कालावधीत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादीची आकडेवारी जाहीर करण्यात आली. मात्र मतदारसंख्येचा घोळ कायम राहिल्याने अंतिम यादी जाहीर होऊ शकली नाही.

२७ प्रभागातील मतदार वाढले, तर २५ प्रभागातील कमी झाले –

निवडणूक शाखेकडून जाहीर केल्यानुसार शहरात ३४ लाख ५४ हजार ६३९ इतके अंतिम मतदार आहेत. एकूण २७ प्रभागातील मतदार वाढले आहेत, तर पंचवीस प्रभागातील मतदार कमी झाले आहेत. तर ६ प्रभागांचा अजून निर्णय झालेला नाही. प्रभाग क्रमांक ५४ धायरी आंबेगाव येथे प्रारूप यादीत १ लाख ३ हजार ९५९ मतदार होते. चुकीच्या पद्धतीने याद्या फोडल्याचे निदर्शनास आल्यानंतर या प्रभागातील मतदार ३० हजार १७५ ने कमी झाले आहेत. हे मतदान खडकवासला-नऱ्हे प्रभागात वळविण्यात आले आहे. धनकवडी आंबेगाव पठार या प्रभागात ८ हजार ९२५ मतदान वाढले आहे. कोथरूड जयभवानीनगर काळेवाडी या प्रभागातील ११ हजार ३५५ मतदान वाढले आहे. तर त्याच्या लगतच्या कोथरूड गावठाण-शिवतीर्थ नगरचे मतदान ८८९६ मतदान कमी झाले. आयडियल कॉलनी-महात्मा सोसायटी येथील २ हजार ८०२ मतदार वाढले आहेत.

पाच हजार मतदारांचे प्रभाग बदलले –

सहा प्रभागांच्या मतदार संख्येवरून अद्यापही घोळही सुरूच आहे. उर्वरित ५२ प्रभागांची केवळ अंतिम मतदार संख्या जाहीर झाली आहे, पण त्यातून नेमक्या कोणत्या भागातील मतदार वाढवले, कुठले कमी केले हे स्पष्ट झालेले नाही. शहरातील प्रभागांमध्ये पाच हजारांपेक्षा जास्त मतदारांचे प्रभाग बदललेले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply