पुणे : थंडी पुन्हा पळाली ; पावसाळी स्थितीचा अडथळा – आठवडाभर तापमानात वाढ

पुणे : दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाळी स्थिती निर्माण होत असतानाच महाराष्ट्रातील रात्रीच्या किमान तापमानात अचानक मोठी वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. किमान तापमान सरासरीच्या तुलनेत २ ते ६ अंशांनी वाढले आहे. दिवसा निरभ्र आकाशाच्या स्थितीमुळे उन्हाच्या चटक्यातही वाढ झाली आहे. तापमानवाढीची ही स्थिती रब्बीच्या पिकांसाठी पोषक नाही आणि सातत्याने बदलणारे वातावरण आरोग्याच्या दृष्टीनेही अनुकूल नसल्याचे मत अभ्यासकांकडून व्यक्त केले जात आहे. पुढील सुमारे आठवडाभर तापमानातील वाढ कायम राहून, राज्यात काही भागांत ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र तापमानात घट होणार आहे.

नोव्हेंबर महिन्यामध्येही तापमानात सातत्याने चढ-उतार झाले. मात्र, या महिन्यात पंधरवाड्यानंतर काही काळ चांगली थंडी अनुभवता आली. अनेक भागांतील तापमान हंगामातील नीचांकी पातळीपर्यंत खाली आले होते. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भाग आणि कोकणात काही भागांत कडाक्याची थंडी होती. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे ही थंडी होती. त्यातून रब्बी हंगामातील पिकांना लाभ झाल्याचे शेती अभ्यासकांकडून सांगण्यात आले. नागरिकांनाही काही काळ गुलाबी थंडीची अनुभूती आली. मात्र, त्यानंतर उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला आणि दक्षिणेकडील बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव निर्माण झाल्याने थंडी गायब झाली.

भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अंदाजानुसार डिसेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात कडाक्याची थंडी असणार आहे. मात्र, महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानवाढ झाली. त्यामुळे महिन्याचा पहिला आठवडा थंडीविना जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या राज्यात कोणत्याही ठिकाणी रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या खाली नाही. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सरासरीपेक्षा २ ते ६ अंश खाली गेलेले तापमान सध्या तितकेच सरासरीच्या तुलनेत वाढले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तापमान सरासरीपेक्षा तब्बल ३ ते ७ अंशांनी वाढले आहे. विदर्भात १ ते ३ अंशांनी वाढ झाली आहे. मुंबईसह कोकणात सर्वत्र किमान तापमानात २ ते ३ अंशांची वाढ आहे. दिवसाच्या कमाल तापमानाचा पाराही सरासरीपुढे आहे. महाबळेश्वर वगळता सर्वत्र दिवसाचे तापमान ३० ते ३४ अंशांच्या आसपास आहे.

तापमानवाढ कशामुळे?

उत्तरेकडील राज्यांत सध्या थंडीचे प्रमाण कमी आहे. त्यातच आता बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती सुरू झाली आहे. या भागातून उत्तरेकडे वारे वाहत आहेत. काही भागांत अंशत: ढगाळ वातावरण तयार होत आहे. परिणामी महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव कमी होऊन तापमानात वाढ झाली आहे. ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि दक्षिणेकडील इतर काही भागांत पावसाची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काही भागांत ढगाळ स्थिती राहील. परिणामी आठवडाभर तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply