पुणे : ‘जीएसटी’मुळे दुग्धजन्य पदार्थाची दरवाढ; दही, ताकाच्या किरकोळ विक्री दरात पाच टक्क्यांनी वाढ

पुणे : दही, ताक, लस्सी या दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीवर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा परिणाम म्हणून दही, ताक आणि लस्सीच्या विक्री दरात सरासरी पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमूल आणि चितळे डेअरीने दुग्धजन्य पदार्थाच्या विक्रीत वाढ केली आहे. याचा परिणाम म्हणून सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.

 केंद्र सरकारने दही, ताक आणि लस्सी या दुग्धजन्य पदार्थाच्या वेष्टनांकित विक्रीवर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणून अमूल आणि चितळेसारख्या नामांकित कंपन्यांनी आपल्या दही आणि ताकाच्या विक्री दरात पाच टक्क्यांनी वाढ केली आहे. सध्या हंगाम नसल्यामुळे लस्सीला फारशी मागणी नसल्यामुळे लस्सीच्या विक्री दरात वाढ करणे टाळले आहे.  अमूलने एक किलो दह्याच्या पिशवीमागे चार रुपयांची वाढ केली आहे. ७० प्रति किलो मिळणारे दही आता ७४ रुपये प्रति किलोंवर गेले आहे. ताक ३० रुपये लिटर होते, त्यात दोन रुपयांची वाढ होऊन ते ३२ रुपयांवर गेले आहे. अशीच दही, ताकाच्या विक्रीत सरासरी पाच टक्क्यांची वाढ चितळे समूहाने केली आहे.

गोवर्धन डेअरीचे प्रीतम शहा, ऊर्जा डेअरीचे प्रकाश कुतवळ आणि कात्रज डेअरीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक संजय कालेकर यांनी पाच टक्के जीएसटी आकारण्यामुळे दरवाढ करून ग्राहकांवर लगेच आर्थिक बोजा टाकण्याची गरज नसल्याचे मत व्यक्त केले आहे. दही, ताक, लस्सीच्या प्लास्टिक पिशवीचे वेष्टन किंवा प्लास्टिक कपाच्या वेष्टनासाठी लागणाऱ्या कच्चा मालावर १८ टक्के जीएसटी भरावा लागत होता. यापूर्वी दही, ताकाच्या विक्रीवर कर नसल्यामुळे कर परताव्याचा फायदा घेता येत नव्हता. आता उत्पादनाच्या अंतिम विक्रीवर कर असल्यामुळे वेष्टनाच्या कच्च्या मालासाठी द्यावा लागलेला जीएसटी कर परताव्याने मिळणार आहे. त्यामुळे पाच टक्के जीएसटीचा खूप मोठा फटका बसेल, असे चित्र नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे. पुढील महिन्याभरात दूध संकलनात वाढ झाल्यानंतर दूध खरेदीदर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही सध्या तरी कोणतीही वाढ करणार नाही, असे प्रीतम शहा आणि प्रकाश कुतवळ यांनी सांगितले. 

दैनंदिन संकलन १ कोटी ४० लाख लिटर

राज्याचे दैनंदिन दूध संकलन १ कोटी ४० लाख लिटर आहे. पावसाळय़ाचा परिणाम म्हणून हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढल्यानंतर साधारण ऑगस्ट महिन्यात दूध संकलनात पाच ते सात टक्क्यांनी होऊन दूध संकलन १ कोटी ६० लाख लिटरहून अधिक होण्याची शक्यता दुग्ध व्यवसायाचे अभ्यासक प्रकाश कुतवळ यांनी व्यक्त केली. सध्या दूध पावडरचे दर प्रति किलो ७५ रुपये आणि बटरचे दर प्रति किलो ३८० रुपये असल्यामुळे शेतकऱ्यांकडून दूध खरेदी दरात कपात करण्यात आलेली नाही. ३.५ फॅटच्या गायीच्या दुधाची खरेदी ३३ ते ३५ रुपयांनी तर सहा फॅटच्या म्हशीच्या दुधाची खरेदी ४५ रुपये ३० पैसे दराने सुरू आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply