“काही पर्यायच उरला नव्हता”, ट्विटरमधील ५० टक्के कर्मचारी कपातीवर एलॉन मस्क यांचं स्पष्टीकरण!

आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रातील सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी एक ठरलेला ट्विटर खरेदीचा व्यवहार नुकताच पार पडला. टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर्सला ट्विटरची खरेदी केली. या घडामोडींमुळे बाह्य विश्वासोबतच ट्विटरमधील कर्मचारी मंडळीही संभ्रमात आली होती. नव्या मालकीनंतर आता कंपनीत काय बदल होणार? याविषयी उत्सुकता आणि भीती अशा दोन्ही भावना कर्मचाऱ्यांच्या मनात होत्या. अखेर उत्सुकतेपेक्षा कर्मचाऱ्यांची भीतीच खरी ठरली. एका झटक्यात एलॉन मस्क यांनी जवळपास ५० टक्के ट्विटर कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून घरी पाठवलं. त्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू असून ट्विटरबाबत जाहिरातदारांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द एलॉन मस्क यांनी ट्वीट करून यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.

एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर सर्वात आधी कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांची गच्छंती केली. त्यानंतर सीएफओ नेड सेगल, पॉलिसी चीफ विजया गड्डे यांनाही डच्चू दिला. त्यामुळे ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. त्यांची भीती खरी ठरली असून एलॉन मस्क यांनी ५० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. शुक्रवारी रात्री ९ च्या सुमारास या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याचे मेल पाठवण्यात आले.

एलॉन मस्क यांनी या निर्णयासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे पाचच्या सुमारास ट्वीट करून याबाबत माहिती दिली. “ट्विटरमधील कर्मचारी कपातीविषयी बोलायचं झालं, तर दुर्दैवाने आमच्यासमोर काही पर्यायच उरला नव्हता. कंपनीचं दिवसाला तब्बल ४ दशलक्ष डॉलर्सचं नुकसान होत होतं”, अशी माहिती मस्क यांनी दिली आहे.

“ज्यांना कामावरून काढण्यात आलं आहे, त्यांना तीन महिन्यांचा परतावा देण्यात आला आहे. नियमात असल्यापेक्षा हा आकडा किमान ५० टक्क्यांनी अधिक आहे”, असंही ट्वीटमध्ये मस्क यांनी म्हटलं आहे.

ट्विटरच्या कर्मचारी कपातीमध्ये भारतातील २३० पैकी १८० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही कर्मचारी कपात ट्विटरच्या सर्वच विभागांमध्ये करण्यात आली आहे. अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक बाबी हाताळणाऱ्या विभागामध्ये फक्त कपात करण्यात आलेली नाही. या कर्मचाऱ्यांना सध्या नोकरीवर कायम ठेवण्यात आलं असून त्यांच्या भविष्यातील भूमिकांविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं ट्विटरकडून कर्मचाऱ्यांना कळवण्यात आलं आहे.

दरम्यान, ट्विटर खरेदीचा व्यवहार झाल्यानंतर वेगाने होत असलेल्या घडामोडींमुळे ट्विटरचे जाहिरातदार चिंतेत आले आहेत. ट्विटरवर सुरू असलेल्या जाहिराती कायम ठेवायच्या आहेत की थांबवायच्या आहेत, यासंदर्भात निर्णय घेण्याचा दबाव कंपन्यांवर येऊ लागला आहे. यामध्ये युनायटेड एअरलाईन्स होल्डिंग्ज, मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन, व्हेरिझॉन कम्युनिकेशन्स, चार्टर कम्युनिकेशन्स अशा अनेक बड्या कंपन्यांचा समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply