अतिवृष्टीने डाळिंबाचे ५०० कोटींचे नुकसान

पुणे : जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवडय़ात झालेल्या अतिवृष्टीचा, संततधार पावसाचा फटका राज्यातील डाळिंब उत्पादकांना बसला आहे. आंबिया बहरातील सुमारे ४० टक्क्यांवरील डाळिंबाचे पीक फळकुज आणि तेलकट रोगामुळे मातीमोल झाले आहे. संततधार पावसाचा फटका सांगली, सोलापूर, पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. मुळातच खोडकिडी, तेल्या रोगाने राज्यातील सुमारे ७० टक्के डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या आहेत. आता उरलेल्या सुमारे ५० हजार हेक्टरवरील बागाही अडचणीत आल्या आहेत. मागील दहा-बारा दिवसांपासून बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी आणि संततधार पाऊस सुरू होता. अतिवृष्टीचा फारसा फटका डाळिंबाला बसत नाही. मात्र, संततधार पाऊस डाळिंबाला धोकादायक असतो. वातावरणात आद्र्रता वाढून बुरशीजन्य रोगासह तेल्या आणि फळकुज मोठय़ा प्रमाणात झाली आहे. आंबिया बहरात घेतलेल्या एकूण बागांपैकी ४० टक्क्यांवरील बागांना या पावसाचा फटका बसला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात डाळिंब बाजारात यावीत. चांगला दर मिळावा म्हणून शेतकरी आंबिया बहर घेतात. या बहरात उत्पादित झालेले डाळिंब शक्यतो स्थानिक, देशांअर्तगत बाजारातच विकली जातात. काही प्रमाणात बांगलादेशसह आखाती देशांना निर्यात होते. युरोपीय देशांना आंबिया बहरातील डाळिंबे निर्यात होत नाहीत.

मृग बहरालाही फटका? डाळिंबाचे आता जे नुकसान दिसते आहे, तो आंबिया बहरातील आहे. फळे साधारणपणे १५० ते २०० ग्रॅम वजनाची झाली आहेत. ही फळे काळी पडून, फुटून गळून पडत आहेत. जी फळे झाडावर आहेत, तीही अखेपर्यंत चांगली राहतील, असे दिसत नाही.  काही बागा शंभर टक्के तर काही बागांचे ५० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. मृग बहरातील फळे आता कळी, फुलोरा अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांचे नुकसान अद्याप समोर आले नाही. मात्र, पाणी जास्त झाल्यास डाळिंबाच्या कळय़ा, फुले गळून जाण्याचा धोका आहेच.

राज्यातील डाळिंबाचे मोठे क्षेत्र या पूर्वीच खोडकिडी आणि तेल्या रोगाला बळी पडले आहे. आता झालेला पाऊस डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठय़ा नुकसानीचा ठरला आहे. आंबिया बहर घेतलेल्या शेतकऱ्यांचे सुमारे ५०० कोटींचे नुकसान झाले आहे. खोडकिडी, तेल्यासारख्या रोगांचे चक्रच सुरू झाले आहे. आंबिया, मृग आणि हस्त, अशा वेगवेगळे बहर घेतले जात असल्यामुळे रोगांची, किडीची साखळी खंडित होत नाही. ही साखळी खंडित होण्यासाठी पुढील किमान दोन वर्षे डाळिंबाची नव्याने होणारी लागवड थांबविली पाहिजे. अन्यथा उरलेल्या बागाही तोडून काढव्या लागतील.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply