सोलापूर : आषाढी यात्रेसाठी पंढरी सज्ज; करोनाचा वाढता प्रादुर्भाव, रखडलेल्या कामांचे प्रशासनासमोर आव्हान

सोलापूर : करोनाच्या महामारीमुळे मागील दोन वर्षे साध्या पद्धतीने झालेली पंढरपूरची आषाढी यात्रा आणि पालखी सोहळा यंदा करोनाचे संकट दूर होऊन निर्बंधमुक्त वातावरणात संपन्न होणार आहे. त्यामुळे साहजिकच यंदाचा पालखी सोहळा आणि आषाढी यात्रा प्रचंड मोठी होण्याची अपेक्षा आहे. पंढरपुरात सुमारे १५ लाख वारकरी आणि भाविकांची मांदियाळी होण्याचा प्रशासनाचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने यात्रेच्या नियोजनाची तयारीत प्रशासन गुंतले आहे. दुसरीकडे यात्रेच्या तोंडावरच राज्यात करोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे प्रशासनही सजग झाले आहे. यात्रेच्या शेवटच्या क्षणी अधिक खबरदारी घ्यावी लागणार असल्यामुळे प्रशासनाबरोबरच वारकरी संप्रदायाचीही जबाबदारी वाढली आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगाच्या भेटीसाठी लाखो वारकरी आषाढी यात्रेची वाट पाहात असतात. आषाढीसह कार्तिकी, माघी चैत्री अशा चार वाऱ्या पंढरपुरात होतात. या वाऱ्यांवरच पंढरपूरचे एकूण अर्थकारण अवलंबून असते. विशेषत: आषाढी यात्रा सर्वात मोठी असल्यामुळे एकूणच धार्मिक, आध्यात्मिक, आर्थिक आदी सर्व दृष्टींनी या यात्रेला महत्त्व आहे. यंदाच्या आषाढी यात्रेसह विविध ज्येष्ठ श्रेष्ठ संतांच्या पालखी सोहळय़ांचे वेळापत्रक जाहीर झाले असून काही संतांच्या पालख्यांनी आपापल्या ठिकाणांहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज आदी पालख्या टाळ मृदुंगासह पांडुरंगाचा घोष करीत पारंपरिक मार्गावरून चालत निघाल्या आहेत. तर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळय़ाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी आतापासूनच वारकरी आणि भाविकांची गर्दी देहू, आळंदीसह पंढरपुरात होऊ लागली आहे.

आषाढी यात्रा जशी जवळ येते, तशी स्थानिक जिल्हा प्रशासनाची धांदल उडत असते. मागील सलग दोन वर्षे करोना महामारीमुळे पंढरपूरच्या सर्व यात्रांवर कठोर निर्बंध लागू होते. वारकऱ्यांविना प्रातिनिधिक स्वरूपातच यात्रा पार पाडाव्या लागल्या होत्या. आषाढीच्या काळात शहराच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या.

यंदा समस्त वारकरी संप्रदाय यंदा आषाढी यात्रेसाठी पांडुरंगाच्या भेटीकरिता आसुसलेला आहे. त्यामुळेच आषाढी यात्रा आणि पालखी सोहळा प्रचंड मोठय़ा प्रमाणात संपन्न होण्याचा अंदाज बांधून प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. यात तेवढय़ाच अडचणीही दिसत आहेत. विशेषत: करोनाचा प्रसार ऐनवेळी पुन्हा वाढू लागल्यास काय उपाययोजना करायच्या, याचेही नियोजन प्रशासनाला तेवढय़ाच गांभीर्याने करावे लागणार आहे.

आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा होणारा पालखी सोहळा सर्वात मोठे आकर्षण मानले जाते. देहू, आळंदी ते पंढरपूपर्यंतच्या पालखी मार्गाचे रुंदीकरणाचे यापूर्वीच सुरू झालेले काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. काही उड्डाणपूल व काही ठिकाणांचे काम पूर्ण होणे शिल्लक आहे. ही कामे सध्या युद्धपातळीवर केली जात असून येत्या आठवडाभरात ही सर्व कामे पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आधिपत्याखाली प्रशासन अधिक सक्रिय झाले आहे.

रस्ते रुंदीकरणामुळे पालखी मार्गावरील विसावा ठिकाणे, रिंगण सोहळय़ाची ठिकाणे, पालखी मुक्कामाची ठिकाणे थोडय़ाफार प्रमाणात बदलणार आहेत. वारकऱ्यांच्या वाढत्या सहभागामुळे पालख्यांच्या रिंगण सोहळय़ाची जागा अपुरी पडते. त्यामुळे ठिकाणात बदल करण्यात आला आहे. अर्थात वारकरी संप्रदायासह पालखी सोहळा प्रमुखांबरोबर वेळोवेळी समन्वय साधून, पालखी मार्गावरील ठिकाणांची पाहणी करून परस्पर विश्वासाने सूचनांचे पालन करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे त्यात काही बदल करताना वाद निर्माण होणार नाहीत, याची दक्षता जिल्हाधिकारी शंभरकर यांनी घेतली.

पालखी मार्गावरून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी (ता. माळशिरस) येथे प्रवेश करतो, तेव्हा तेथे पालखीचे स्वागत होते. धर्मपुरी ते पंढरपूर हे अंतर ८० किलोमीटर आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळय़ाचे सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे आगमन होते. अकलूज ते पंढरपूर हे अंतर ५० किलोमीटर आहे. धर्मपुरी येथे सध्या कालव्यालगत महामार्ग रुंदीकरणाचे अंतिम टप्प्यात काम सुरू आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळय़ाचे स्वागत कारूंडे विसावा येथे होणार आहे. खडूस फाटा येथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा होतो. तेथे सध्या उड्डाणपुलाचे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला सेवा मार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सर्व कामे वारीअगोदर पूर्ण होतील, असा प्रशासनाला विश्वास वाटत असला तरी प्राप्त अडचणी पाहता ही कामे वेळेत युद्धपातळीवर पूर्ण करून घेण्याचे आव्हान आहे.

वारकऱ्यांचीही जबाबदारी

आषाढी यात्रा जवळ येऊन ठेपली असतानाच मुंबई, ठाणे, पुण्यासह सहा जिल्ह्यांमध्ये करोनाचे रूग्ण पुन्हा वाढू लागल्यामुळे त्याचे लोण पंढरपूर यात्रेत पोहोचू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. संभाव्य दहशतवादी घातपात रोखण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन कायदा प्रभावीपणे राबवावा लागणार आहे. पालखी मार्गावर सर्व गावांमध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे कार्यरत राहणार आहेत. वारकरी आणि भाविकांनी स्वेच्छेने मुखपट्टय़ांचा वापर करणे आवश्यक आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply