पुणे : टेंभू, म्हैसाळ, ताकारी सिंचन योजनेतून सात तालुक्यांमधील दुष्काळी ४५० गावांना फायदा ; ५० टीएमसी पाणी उचलले

सातारा आणि सांगली जिल्ह्यातील धरणांमधून कृष्णा नदीतून सोडलेले विसर्गाचे उचललेले तब्बल ५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमधील दुष्काळी सात तालुक्यांमधील ४५० गावांना यंदाही देण्यात येणार आहे. त्यामुळे या गावांना फायदा होणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे यंदाही कृष्णा नदीतून सोडलेले विसर्गाचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.

सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतील धरणे भरल्यानंतर विसर्गाचे पाणी कृष्णा नदीमधून पुढे कर्नाटकात जाते. पावसाळ्यात विसर्गाचे काही पाणी दुष्काळी भागात वळवण्याबाबत जुनी मागणी होती. त्याबाबत जलसंपदाच्या पुणे विभागाने नियोजन करून सन २०२० मध्ये पाणी उपसा करून दुष्काळी भागाला दिले होते. सातारा जिल्ह्यातील टेंभू आणि सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनांद्वारे पाण्याचा उपसा करून सांगली व सोलापूर जिल्ह्यांमधील तलावांमध्ये सोडण्यात येणार आहे. परिणामी पुराचा धोकाही काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज, जत, खानापूर, तासगाव, आटपाडी आणि कवठेमहांकाळ, तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि मंगळवेढा या तालुक्यांमधील तलावांत हे पाणी सोडण्यात येणार आहे. पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग सुरू असेपर्यंत पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन आहे.

याबाबत बोलताना जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले म्हणाले, ‘म्हैसाळ योजनेला सन २०१७ मध्ये मोठी गती मिळाली. त्यानंतर २०१७-१८ या वर्षात या योजनेसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विभागाला मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला. या निधीमधून केलेल्या कामांमुळे म्हैसाळ योजनेंतर्गत पाचव्या टप्प्याच्या पुढे म्हणजेच सांगलीतील जतपर्यंत पाणी जाऊ शकले. तसेच जतमधील तीन उपसा सिंचन योजना दीड वर्षांत कार्यान्वित करण्यात आल्या. आता या योजनांमधून सांगोला, मंगळवेढा, जत अशा दुष्काळी भागात पाणी देता येऊ शकते. या भागातील कामे या निधीतून करण्यात आली. तसेच पंप, जलवाहिनी, व्हॉल्व्ह अशी यांत्रिकीची कामे पुन्हा नव्याने करण्यात आली आहेत.’

दरम्यान, टेंभू योजनेतून २२ टीएमसी पाणी उचलण्यात आले आहे, तर म्हैसाळ आणि ताकारी योजनेतून २८ टीएमसी असे ५० टीएमसी पाणी उचलण्यात आले आहे. टेंभू आणि म्हैसाळ योजनेंतर्गत प्रत्येकी एक लाख हेक्टर, तर ताकारी योजनेंतर्गत ४० हजार हेक्टर क्षेत्र आहे. या योजनांतर्गत २७ पंपिंग स्थानके असून त्या माध्यमातून पाणी उचलण्यात येते, असेही गुणाले यांनी स्पष्ट केले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply