इम्रानशाही खालसा! मध्यरात्री पाकिस्तानातील सरकार पडलं

इस्लामाबाद: सत्ताधारी पक्षांच्या सदस्यांचा सभात्याग, सभात्यागावेळी सत्ताधारी व विरोधीपक्षांच्या सदस्यांमध्ये सभागृहातच झालेली हाणामारी आणि शनिवारी मध्यरात्री अविश्वास ठरावावर झालेले मतदान अशा नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानातील `इम्रानशाही` अखेर खालसा झाली. अविश्वास ठरावाच्या बाजूने १७४ मते मिळाली, तर विरोधात शून्य मते मिळाली. अशा प्रकारे पदावरून हटविले जाणारे इम्रान खान  हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

इम्रान खान यांना सत्ताच्युत करण्यासाठी ३४२ सदस्यांच्या सभागृहामध्ये विरोधकांना १७२ सदस्यांचे बळ आवश्यक होते. विरोधकांना इम्रान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिके- इन्साफ’ या पक्षाचे मित्र असणाऱ्यांचाही पाठिंबा मिळाला आहे. (Imran Khan)

शेवटच्या चेंडूपर्यंत सत्तेचा गेम खेळण्याचा निर्धार करत मैदानात उतरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज विरोधकांना अक्षरशः दिवसभर झुलविले. परंतु, ते दिवसभरात नॅशनल असेंब्लीत फिरकलेच नाहीत. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास ठरावावरील मतदानाला बगल देत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला इम्रान खान यांनी राजीनामा द्यावा म्हणून ‘आयएसआय’ आणि लष्करानेही दबाव आणला होता पण शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत इम्रान यांनी हा दबाव झुगारून लावत पंतप्रधानपदाचा राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला.

‘नॅशनल असेंब्ली’च्या सभापती असद कैसर यांनी देखील इम्रान यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. इम्रान खान यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावावर मतदान न घेण्याची भूमिका त्यांनी घेतली व सभापतीपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना त्यांनी इम्रान यांच्याबरोबरील ३० वर्षांच्या मैत्रीचा हवालाही दिला. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार शनिवारी अविश्वास ठरावावर मतदान घेणे बंधनकारक होते. न्यायालयाचा निकाल न मानल्यास सभापतींवरही टांगती तलवार होती. त्यापासून कैसर यांनी बचावात्मक पवित्रा घेत राजीनामा दिला. त्यांच्यापाठोपाठ उपसभापतींनीही राजीनामा दिला. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांनी नॅशनल असेंब्लीतून सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. हे सर्व नाट्य पाकिस्तानच्या स्थानिक वेळेनुसार पावणेबारापर्यंत सुरू होते. नंतर पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाज)चे अयाज सादिक यांच्याकडे सभागृहाच्या सभापतीपदाची सूत्रे सोपविण्यात आली. त्यांनी शनिवार संपण्यापूर्वी अविश्वासदर्शक ठरावावरील मतदानाची प्रक्रिया सुरू केली. स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री १२ वाजता सभागृहाचे कामकाज दोन मिनिटांसाठी तहकूब केले व पुन्हा १२ वाजून दोन मिनिटांनी कामकाज सुरू करत ठरावावरील मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली. स्थानिक प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री एक वाजता निकाल जाहीर करण्यात आला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply