अमरावती : काँग्रेसचा पक्षाच्याच आमदारावर बहिष्कार; अमरावतीमध्ये आगामी निवडणुकीतील संघर्षांची नांदी

अमरावती :  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दोनदिवसीय अमरावती दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या स्थानिक आमदार सुलभा खोडके यांना निमंत्रित न करण्यात आल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीविषयीच्या संघर्षांची ही नांदी मानली जात आहे.

वर्षभरापूर्वी माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर देशमुख गट आणि खोडके गट आमने-सामने येतील अशी शंका व्यक्त करण्यात येत होती, ती आता खरी ठरू लागली आहे. सुलभा खोडके यांचे पती संजय खोडके हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. त्यांच्या गटाचे स्वतंत्र राजकारण हे महापालिकेत आहे. डॉ. सुनील देशमुख आणि त्यांच्यात उघड संघर्ष नसला, तरी ते प्रतिस्पर्धी आहेत. गेल्या निवडणुकीत खोडके यांनी डॉ. देशमुख यांचा पराभव केला होता, ही एक किनार या संघर्षांला आहे. काँग्रेस पक्षाच्या अनेक बैठका या डॉ. सुनील देशमुख यांच्या कार्यालयातील सभागृहात होतात. त्या बैठकींमध्ये सुलभा खोडके यांना निमंत्रित केले जात नाही. गेल्या वर्षभरात सुलभा खोडके या काँग्रेसच्या आंदोलनांमध्ये सहभागी झाल्या, पण त्यांना अनेक ठिकाणी डावलण्यात येत असल्याची भावना खोडके समर्थकांमध्ये निर्माण झाली. त्यातून खुला संघर्ष जरी नसला, तरी नाराजीचा सूर होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान तो उघड झाला आहे. डॉ. सुनील देशमुख यांनी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश घेतल्यापासून आपल्याला स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून कोणत्याही बैठकीला बोलाविण्यात आले नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या दौऱ्यासंदर्भातदेखील आपल्याला कळवण्यात आले नाही. कुठलेली निमंत्रण मिळाले नाही. त्यामुळे दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये आपण हजर राहू शकले नाही, असे सुलभा खोडके यांचे म्हणणे आहे. मी आजपर्यंत कधीही काँग्रेस पक्षाची  विचारधारा सोडून कोणत्याही पक्षात गेली नाही. मी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेस मध्ये प्रवेश केला. पक्षाच्या उमेदवारीवर व पंजाच्या चिन्हावर २०१४ मध्ये बडनेरा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती, अवघ्या पाच हजार मतांनी माझा पराभव झाला. २०१९ ला पुन्हा काँग्रेस पक्षाकडूनच अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवीत विजयी झाले, भाजपच्या उमेदवाराचा तब्बल २० हजार मतांनी पराभव केला. त्यामुळे मी काँग्रेस पक्षामध्येच आहे, पुढेही मला काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळेल, असा मला पूर्ण विश्वास आहे, असा दावा सुलभा खोडके यांनी केला आहे. पुढील आठवडय़ात पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन काँग्रेसमध्ये आपली अवहेलना होत असल्याबाबत माहिती देणार असल्याचे सुलभा खोडके यांचे म्हणणे आहे. अमरावती विधानसभा मतदार संघावर सुलभा खोडके आणि डॉ. सुनील देशमुख यांनी उमेदवारीचा दावा केल्यास संघर्ष कडवा होण्याचे संकेत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply