Wardha Water Source : धक्कादायक! ४२ गावांतील ९५ जलस्त्रोतांमध्ये ‘नायट्रेट’; भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल

 

Wardha : वर्धा जिल्ह्यातील भूगर्भातील जलसाठ्यांपैकी ७.१ टक्के जलसाठ्यांमध्ये नायट्रेट आढळून आला आहे. पाणीपुरवठा विभागाने केलेल्या चाचण्यांमधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत जिल्ह्यातील नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होऊन त्याचा आरोग्यावर घातक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

भूजल सर्वेक्षण आणि वर्धा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाणी गुणवत्तेची वेळोवेळी तपासणी केली जाते. जलस्त्रोतांमध्ये सुधारणा करणे ही तांत्रिक बाब देखील पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करणे अपेक्षित असते. पण मागील एका वर्षात ४२ गावात नायट्रेटचे प्रमाण असताना यावर ठोस पावले उचलली गेली नाही. आता त्याबाबतचा अहवाल समोर आला असून पाणी पुरवठा विभागाकडून पुन्हा पाणी तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

१३३० स्त्रोतांची तपासणी

वर्धा जिल्ह्यातील ५२० ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या ८८० गावातील १ हजार १४४ जलस्त्रोतांपैकी १ हजार ३३० स्त्रोतांचे स्मॅपल घेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. २०२४-२५ या वर्षात मान्सूनपूर्व आणि मान्सून पश्चात पाणी नमुने प्रयोगशाळेतून तपासण्यात आले. यात तपासणी अहवालानुसार ४२ गावांतील ९५ स्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण आढळून आल्याची धक्कादायक बाब उजेडात आली.

Nandurbar : मांजामुळे झालेला अपघात पाहिला अन् घडले मोठे कार्य; १८ वर्षांपासून पाच दिवस व्यवसाय बंद ठेवत करतात अनोखे काम

वर्धा व सेलू तालुक्यात सर्वाधिक नायट्रेट

सेलू तालुक्यातील ३५ स्त्रोतांमध्ये १७.२ टक्के आणि वर्धा तालुक्यातील ३५ स्त्रोतांमध्ये १६.९ टक्के म्हणजेच सर्वाधिक नायट्रेटचे प्रमाण आढळून आले. तसेच कारंजा आणि समुद्रपूर तालुक्यातील काही गावांमध्ये जलस्त्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण आढळून आले आहे. नायट्रेटमुळे लहान मुले, गर्भवती महिला आणि आरोग्याने कमकुवत असलेल्या व्यक्तींना गंभीर धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. नायट्रेटमुळे त्वचारोग, ब्लू बेबी सिंड्राेम, नवजात बालकांत श्वसनाचे आजार एवढच नव्हे, तर कँसर आणि थायरॉईडचा धोका सुद्धा आहे.

स्रोत बंद करण्याचा सूचना

भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार वर्धा जिल्ह्यातील तब्बल ४२ गावांमध्ये ९५ स्त्रोतांतील पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने हे स्त्रोत लवकरात लवकर बंद करणे अथवा यात सुधारणा करणे आवश्यक झाले आहे. ४२ गावांमध्ये पिण्याच्या पाण्यात ४५ पीपीएमपेक्षा जास्त नायट्रेट आढळून आले आहे.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply