Unseasonal Rain : अवकाळीने दाणादाण; हापूस आंब्यासह द्राक्षे, डाळिंब, संत्रा, लिंबू, केळी बागांना तडाखा

पुणे - उन्हाचा चटका असह्य होत असतानाच, राज्यात वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांना दणका दिला. धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यांत झालेल्या वादळी पाऊस, गारपिटीने पिके भुईसपाट झाली आहेत. प्रमुख रब्बी पिके, कांद्यासह भाजीपाला आणि फळबागांनाही पावसाचा तडाखा बसला आहे. आंबा पिकाचेही नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारकडून मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

खानदेशात शनिवार (ता. ४)पासून ठिकठिकाणी वादळ, पाऊस व गारपिटीने तडाखा दिला आहे. सोमवारी सायंकाळी व रात्री आणि मंगळवारी सकाळी धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यांतील अनेक गावांत जोरदार गारपीट व वादळी पाऊस झाला. यात हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहे. गारपिटीच्या तडाख्यात मोठे वृक्षही सोलले असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

धुळ्यातील साक्री तालुक्यात टिटाणे गावात सोमवारी सायंकाळी जोरदार गारपीट झाली. काही क्षणांत रस्ते व शेतांत गारांचा खच तयार झाला. वृक्षांनाही गारांनी सोलून काढले. धुळ्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा भागांतही पाऊस व वादळाने कहर केला. ज्वारी, गहू, फळपिके, केळी, हरभरा आदी पिकांची मोठी नासाडी झाली आहे. नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा भागांतही जोरदार गारपीट व वादळाचा पिकांना फटका बसला. जळगाव जिल्ह्यात चोपडा, धरणगाव, अमळनेर, जळगाव, पारोळा, जामनेर, यावल आदी भागांत वादळ व पाऊस झाला. चोपडा, जळगाव तालुक्यांत केळीचेही नुकसान झाले आहे.

नाशिक जिल्ह्यात शनिवार (ता. ४) मध्यरात्रीपासून वादळी पावसाने हजेरी लावली आहे. कळवण, सटाणा, देवळा व मालेगाव तालुक्यांत मोठा फटका बसला. त्यामुळे टोमॅटो व हिरव्या मिरची लागवडी आडव्या झाल्या होत्या. तर रविवारी (ता. ५) व सोमवारी (ता. ६) सलग दोन दिवस विजांच्या कडकडाटासह रात्री कोसळलेल्या पावसाने गहू, द्राक्ष, कांदा पिकाला मोठा तडाखा आहे. इगतपुरी व नाशिक तालुक्यांत काही ठिकाणी गारपीट झाली. निफाड व नाशिक तालुक्यांत द्राक्ष बागांचे मोठे नुकसान आहे. नाशिक, त्र्यंबकेश्‍वर व चांदवड तालुक्यांत आंबा पिकाला फटाका बसणार आहे.

पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत सोमवारी (ता. ६) सायंकाळनंतर दौंड, इंदापूर, शिरूर, बारामती, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर, हवेली या तालुक्यांत वादळी पावसाने हजेरी लावली. बदलत्या हवामानामुळे पिकांवर कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, फवारणीच्या खर्चात वाढ होत आहे.

मराठवाड्यातील अनेक भागांत गत दोन दिवसांपासून विजांचा कडकडाट व वादळासह हजेरी लावणाऱ्या पावसाचा गहू, हरभरा, मका, ज्वारी या पिकांसह आंब्यासह इतरही फळपिकांना मोठा दणका बसला आहे. काही ठिकाणी वीज पडून पशुधनाचीही प्राणहानी झाल्याची माहिती आहे.

छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत अवकाळी पावसाची तीव्रता अधिक होती. जालना जिल्ह्यातील जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद, बदनापूर तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. बीड जिल्ह्यातील परळी, बीड, गेवराई, आष्टी, माजलगाव तालुक्यातील तुरळक मंडलांत, तसेच शिरूर कासार व वडवणी मंडलांत पावसाने हजेरी लावली. लातूर जिल्ह्यातील लातूर, औसा, अहमदपूर, उदगीर, शिरूर अनंतमाळ व चाकूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली.

अवकाळीचा फटका

  • पुणे जिल्ह्यात गहू, हरभरा, मका, द्राक्ष पिकांचे नुकसान

  • नाशिकमध्ये कांदा आणि इतर पिकांचे नुकसान

  • खान्देशात गारांमुळे रब्बी पिके भुईसपाट

  • मराठवाड्यात पिकांसह आंबा आणि इतर फळबागांनाही फटका

  • गेवराई तालुक्यात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस होऊन तुफान गारपीट. टरबूज, खरबूज, पालेभाज्या, फळबागांचे नुकसान

विजांसह वादळी पावसाची शक्यता

पुणे - मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह पश्चिम विदर्भाच्या काही भागांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रात गारपिटीनेही तडाखा दिला आहे. बुधवारी

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यातच राज्यात उन्हाचा चटकाही कायम राहण्याचा अंदाज आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply