पुण्यात दर गुरुवारी पाणीबंद; १८ मेपासून अंमलबजावणी

पुणे : मोसमी पावसावर यंदा एल-निनोचा प्रतिकूल परिणामाची शक्यता विचारात घेऊन अखेर शहरात पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून (१८ मे) होणार आहे. आठवड्यातून एकदा म्हणजे दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन महापालिकेने मे, जून आणि जुलै महिन्यातील पाणी पुरवठ्याचे नियाेजन करण्यासाठी पाणीकपातीचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी मंगळवारी ही माहिती दिली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. तसेच यापूर्वी जलसंपदा विभागाबरोबरच झालेल्या बैठकीत पाणी कपातीवर चर्चा झाली हाेती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवल्यानंतर त्याचा परिणाम पुढील दाेन ते तीन दिवसांच्या पाणी पुरवठ्यावर होतो. जलवाहिन्यांत ‘एअर ब्लाॅक’ मुळे पाणी पुरवठा विस्कळित होतो. ही अडचण दूर करण्यासाठी ‘एअर व्हॉल्व’ बसवून तो सुरळीत होऊ शकत असल्याचे निदर्शनास आले आहे. एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या भागातील पाणी पुरवठा विस्कळित हाेताे, अशी २० ठिकाणे महापालिकेने निश्चित केली आहेत. त्या ठिकाणी ‘एअर वाॅल्व्ह’ बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मदत हाेईल. तसेच या भागात पर्यायी व्यवस्था म्हणून टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जाईल, असे पावसकर यांनी सांगितले.

कपातीतून १५ दिवसांचे पाणी बचतीचा दावा

पहिल्या टप्प्यात आठवड्यातून एकदा पाणी कपात करण्यात येणार असून या कपातीमधून दरमहा ०.२५ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच शहराला १५ दिवस पुरेल, एवढ्या पाण्याची बचत होणार आहे. जून महिन्यात पावसाचे आगमन झाले नाही, तर पाणी कपातीचे दिवस वाढू शकतात. त्यामुळे जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासनाकडून आप्तकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये जलतरण तलाव, वॉशिंग सेंटर यासारख्या गोष्टींवर बंधन आणण्यात येईल, असे महापालिका आयुक्त कुमार यांनी सांगितले.

महापालिका आणि कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा १५ जुलैपर्यंतच पुरेल, असे जलसंपदाकडून सांगण्यात आले. यंदा विलंबाने मोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याचा अंदाज पाहता ३१ जुलैपर्यंत पाणी पुरवायचे असल्यास महापालिकेने दहा टक्के पाणीकपात करावी आणि पाणी जपून वापरण्याबाबत कळविण्यात आले होते. पाणीकपात करायची किंवा कसे, याबाबतचा निर्णय महापालिकेने घेण्याचेही सांगण्यात आले होते.

– ह. वि. गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा पुणे विभाग

धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत

धरण            पाणीसाठा (टीएमसी)    टक्के

टेमघर           ०.२४                   ६.४६

वरसगाव         ५.८२                 ४५.३६ टक्के

पानशेत          २.६०                 २४.४० टक्के

खडकवासला    १.१२                ५६.८२ टक्के

एकूण पाणीसाठा ९.७८                 ३३.५३ टक्के



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply