Pune News : पुण्यातील आयटी कंपन्या स्थलांतरीत होणार? हिंजवडीतून 40 आयटी कंपन्यांचं स्थलांतर?

Pune News : पुण्यातील आयटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीतील आयटी कंपन्या गाशा गुंडाळन स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. त्याला कारण ठरलंय प्रशासनाची अनास्था. आयटी पार्क हिंजवडीत कार्यरत असणाऱ्या सरकारी संस्था आणि त्यामध्ये असलेला समन्वयाच्या अभावामुळे गेल्या 25 वर्षात पायाभूत सुविधांचं भक्कम जाळं उभं करण्यास अपयश आलंय. त्यामुळे 'आयटी'तील सुमारे 40 कंपन्यांनी त्यांचे प्रकल्प स्थलांतरित केलेत, असा दावा परिसरातील उद्योजक आणि हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने केलाय.

पुण्याचा आयटी हब म्हणून विकास करताना हिंजवडी,बाणेर,मगरपट्टा या भागातील अनेक जमिनी कंपन्यांनी कवडीमोल भावात विकत घेतल्या. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड जगाच्या नकाशावर अधोरेखित झालं ते हिंजवडी आयटी पार्कमुळं मात्र त्या तुलनेत पायाभूत सुविधांचा विकास झाला नाही. पर्यायी रस्त्यांचं जाळं उभं न राहिल्यानं वाहतूक कोंडीची बिकट समस्या अद्याप सुटू शकलेली नाही..अऩेक समस्यांनी हिंजवडीतील आयटी हबला घेरलंय.

Cyber Crime : सायबर गुन्हेगारांची नवी शक्कल; राष्ट्रीयकृत बँकेचे नाव आणि लोगो वापरून नागरिकांची फसवणूक

'या' कंपन्यांचा हिंजवडीला रामराम

राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील - बार्कले, नाईस, क्रेडिट स्विस, ल्युमीडेक्स यांसारख्या सुमारे 20 हून अधिक बड्या आयटी कंपन्यांनी हिंजवडीला रामराम केला आहे. यात वेंचुरा टेक्नॉलॉजी, टी क्यूब सॉफ्टवेअर यासारख्या छोट्या कंपन्याचाही समावेश आहे. यातच पुण्यातील बाणेर,खराडी भागात काही कंपन्यांचं स्थलांतर झालं आहे. येत्या काळात आणखी कंपन्या प्रकल्प इतरत्र हलवण्याची शक्यता आहे.

एकीकडे आधीच महाराष्ट्रात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करत असतात. त्यात आता पुण्याची ओळख असलेल्या आयटी हब मधील कंपन्या स्थलांतरीत होत असल्यानं विरोधकांच्या हाती आयतं कोलीत मिळालंय. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. तर हिंजवडी IT पार्कमधील कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश असल्याची टीका सुप्रिया सुळेंनी केलीय.

हिंजवडी 'आयटी' हबमधील रस्त्यांवर सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या रांगा लागतात, त्यामुळे येथील कर्मचारी त्रासलाय. मेट्रो येणार अशा आश्वासनांवर इथला आयटी कर्मचारी रोज लाखो रुपयांचं इंधऩ जाळत दोन-तीन तास वाहतूक कोंडीत अडकतोच..पायाभूत सुविधा कधी मिळणार ? रखडलेली अपूर्ण काम कधी पूर्ण होणार आणि पुणेकरांची सुटका कधी होणार? हा प्रश्नच आहे. मात्र यातून निर्माण होणारी बेरोजगारी ही त्याहून भीषण समस्या आहे.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply