Pune News : उरुळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपो झाला पर्यावरणपुरक अन्‌ हिरवागार !

पुणे : तब्बल 12 हेक्‍टर परिसरात केलेले लाखो घनमीटर कचऱ्याचे केलेले क्‍यापिंग, त्यावरच उभारलेलेले हिरवेगार "अमृतवन', खाणीवरील कॉंक्रीटीकरण, साठलेल्या कचऱ्यावर केली जाणारी प्रक्रिया (बायोमायनींग), त्याद्वारे खतनिर्मिती, मिथेन निर्मिती एवढेच काय, काही प्रमाणात होणारी वीज निर्मिती अशा टप्प्याटप्प्याने उरुळी देवाची - फुरसुंगी कचरा डेपो प्रकल्प आता पर्यावरण पुरक होऊ लागला आहे.

दुर्गंधीमुक्त, देशी वृक्षांच्या हिरवाईने बहारलेला हा परिसर विद्यार्थी, अभ्यासकांसाठी "वेस्ट मॅनेजमेंट टुरीझम' करण्याच्या दिशेने महत्वपुर्ण पाऊल टाकत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्यावतीने उरुळी देवाची - फुरसुंगी कचरा डेपो येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख आशा राऊत, कार्यकारी अभियंता सुधीर चव्हाण, उपअभियंता राजेंद्र तिडके, अभियंता संकेत जाधव यावेळी उपस्थित होते. खेमनार यांच्यासह राऊत, चव्हाण व तिडके व जाधव यांनी प्रकल्पातील विविध कामांची व टप्प्यांची माहिती दिली.

महापालिकेच्या हद्दीतील निर्माण होणाऱ्या कचरा उघड्यावर न टाकता त्यावर प्रक्रिया करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्‍वभुमीवर महापालिकेकडून शहरात गोळा होणाऱ्या 2200 टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध ठिकाणी प्रकल्प उभारण्यात आले आहे. दरम्यान, वेळोवेळी नागरीकांचे होणारे आंदोलन,

आगीच्या घटनांमुळे देवाची उरुळी - फुरसुंगी कचरा डेपो येथे उघड्यावर कचरा टाकण्याचे महापालिकेकडून बंद करण्यात आले. तसेच मागील दोन वर्षांपासून भुमी ग्रीन या संस्थेकडून साठलेल्या कचऱ्याचे बायोमायनींग करुन 21 एकर जागा रिकामी करण्यात आली. डिसेंबर महिन्यापर्यंत 20 लाख मेट्रीक टन कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया पुर्ण करण्यात येणार असल्याचे डॉ.खेमनार यांनी सांगितले.

माती, पाणी, वायु प्रदूषण मुक्तीकडे वाटचाल !

उरुळी देवाची - फुरसुंगी कचरा डेपो येथील कचऱ्यामुळे होणारे माती व पाणी दुषीत होण्यापासून रोखण्यासाठी कचरा डेपोच्या जागेत शास्त्रीय भु-भराव (एसएलएफ) टाकण्यात आला. कचऱ्यातील रसायन माती, पाण्यात मिसळू नये, यासाठी प्लॅस्टिकचा वापर करुन एसएलएफ तयार करण्यात आले. त्यावर एकीकडे वाहिन्यांद्वारे रसायन एका ठिकाणी जमा होऊन त्यापासून होणारी मिथेन गॅस हवेत नष्ट केला जात आहे.

दुसरीकडे त्यावर उभारलेल्या हलक्‍या झाडांमुळे हा परिसर हिरवागार दिसू लागला. त्याचबरोबर प्रकल्पाच्या ठिकाणी साठलेल्या कचऱ्यातुन (बायोमायनींग) विघटनशील व अविघटनशील कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्यातील विघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीवर भर दिला जात आहे. तर प्लॅस्टिकसारख्या अविघटनशील कचरा साठवून तो सिमेंट कारखान्यांना इंधन म्हणून पुरविला जातो.

परिणामी विघटनशील व अविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करणे सोपे होते. पहिल्या टप्प्यात 1 हजार मेट्रीक टन क्षमतेने बायोमायनींग करण्यात आली आहे. तर तीन वर्षात 11.76 लक्ष मीटर टन कचऱ्यावर बायोमायनींग करुन 21 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या टप्प्यांमुळे परिसरातील माती, पाण्याचे प्रदूषण थांबले, याबरोबरच डेपोला आग लागण्याच्या घटना कमी होऊन हवेतील प्रदूषणही कमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कचरा डेपोच्या ठिकाणची वैशिष्ट्ये

- 200 मेट्रीक टन मिश्र कचऱ्यावर प्रक्रिया

- कचऱ्यापासून सेंद्रीय खत निर्मितीला प्राधान्य

- शेतकऱ्यांना नाममात्र दरात खताची विक्री

- सौर उर्जा प्रकल्पाद्वारे 100 किलो वॅट वीज निर्मिती, डेपोच्या परिसरात विजेचा वापर

- "अमृतवन' अंतर्गत देशी प्रजातीची तब्बल 16 हजार झाडांची लागवड

- 15 ते 20 फुटापर्यंत झाडांची वाढ



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply