Pune : मतदान आणि मतदारांची माहिती असुरक्षित? काय आहे नेमका प्रकार?

Pune : देशातील निवडणूक प्रक्रियेमध्ये गुप्त मतदान पद्धती असताना मतदान झाल्यानंतर मतदारांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांनी केलेले मतदान जाणून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे बुधवारी मतदानानंतर निदर्शनास आले. त्यामुळे मतदारांच्या माहितीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान बुधवारी झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतर दूरध्वनीद्वारे मतदारांना संपर्क साधण्यात आला. ‘लोकसत्ता प्रतिनिधी’लाही असा दूरध्वनी आला होता. ध्वनिमुद्रित आवाजाद्वारे मतदारसंघ आणि उमेदवारांची नावे सांगून कोणाला मतदान केले, याची माहिती जाणून घेण्यासाठी अमुक क्रमांक दाबा, अशा स्वरूपाचा हा दूरध्वनी होता. दूरध्वनीद्वारे संपर्क साधणारी संस्था शासकीय आहे, की खासगी आहे, याबाबतची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे परस्पर मतदारांना संपर्क साधण्याचा नेमका उद्देश काय, मतदानाची माहिती संकलित करून सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न आहे का, का ही माहिती मतदानोत्तर पाहणीसाठी घेतली गेली, असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.

यापूर्वी लोकसभा निवडणुकीवेळीही अशाच स्वरूपाचे दूरध्वनी मतदारांना करण्यात आले होते. आता विधानसभा निवडणुकीनंतरही हाच प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकूणच या प्रकारामुळे मतदारांच्या खासगीपणाचा अधिकार, विदा सुरक्षितता याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

Alibaug : मुंबई-पुणे दृतगती मार्गावर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली; ११ जण जखमी

आपल्याकडे गुप्त मतदान पद्धत आहे. त्यामुळे मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान केले, याची माहिती मिळवणे बेकायदा ठरते. दूरध्वनीद्वारे संपर्क साधून मतदानाची माहिती घेणे, हा पुट्टुस्वामी प्रकरणात खासगीपणाचे आयुष्य जगण्याचा अधिकार जपण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान ठरतो. त्यामुळे मतदारांची आणि मतदानाची माहिती असुरक्षित असल्याचे दिसून येते, असे अॅड. ॲड. असीम सरोदे यांनी सांगितले.

तर, मतदारांनी कोणाला मतदान केले हे दूरध्वनीद्वारे जाणून घेणे अयोग्य आहे. या संदर्भात नेमका कायदा काय आहे, हे तपासावे लागेल. मात्र, हा प्रकार मतदारांच्या खासगीपणावर अतिक्रमण करणारा, मतदारांच्या विदा सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा असल्याचे दिसते. तसेच यामुळे मतदानाच्या गोपनीयतेलाही बाधा येऊ शकते, असे माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी नमूद केले.

मोबाइल क्रमांकाचा प्रचारातही वापर

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारप्रक्रियेमध्ये मतदारांना लघुसंदेश पाठवून, ध्वनिमुद्रित दूरध्वनी करून प्रचारही करण्यात आला. तसेच, उमेदवारांकडून मतदान पावतीही लघुसंदेशाद्वारे पाठवण्यात आली होती. त्यामुळे प्रचारासाठी मतदारांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर होत असल्याचेही दिसून आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply