Pune : हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई

Pune : शहरी आणि ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील लढत तिरंगी असली, तरी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात प्रतिष्ठेची लढाई होणार आहे. या भागात विविध समाजांचे वर्चस्व असल्याने जातीय समीकरणेही निर्णायक ठरणार आहेत.

हडपसर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर या मतदारसंघात तीन वेळा निवडणूक झाली. हा मतदारसंघ पुण्यात येत असला, तरी लोकसभेसाठी हा मतदारसंघ शिरूर मतदारसंघात जातो. त्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. सध्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे चेतन तुपे मतदारसंघाचे आमदार आहेत. या मतदारसंघातून चेतन तुपे महायुतीचे उमेदवार, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे प्रशांत जगताप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साईनाथ बाबर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही लढाई वर्चस्वाची आणि प्रतिष्ठेची झाल्याचे चित्र आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये हडपसर मतदारसंघ शिवसेनेला (ठाकरे) मिळावा, अशी आग्रही मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने हा मतदारसंघ स्वत:कडे ठेवण्यात यश मिळविले होते. मात्र, त्यानंतर शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांनी हडपसर विकास आघाडी स्थापन केली होती. त्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही माजी नगरसेवकांनीही पक्षाचा राजीनामा देऊन पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे सन २०१२ च्या महापालिका निवडणुकीप्रमाणे हडपसर विकास आघाडी लढा देईल, असे चित्र असताना नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यात महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना यश आले.

महायुतीचा विचार करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. या मतदारसंघात माळी समाजाचे प्राबल्य आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने माजी आमदार योगेश टिळेकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजप या मतदारसंघात उमेदवारी देणार नाही, हे स्पष्ट झाले होते. जातीय समीकरणे लक्षात घेऊनच टिळेकर यांना संधी देण्यात आली होती.

या सर्व बाबींचा विचार करता हडपसरमध्ये राष्ट्रवादीविरोधात राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे. वर्चस्वाच्या दृष्टीने राष्ट्रवादीसाठी हा मतदारसंघ महत्त्वाचा ठरणार आहे. या मतदारसंघातील तुपे कुटुंबियांचे वर्चस्व, नातीगोती या चेतन तुपे यांच्या जमेच्या बाजू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर तुपे यांनी प्रारंभी तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र, त्यानंतर ते अजित पवार यांच्या गोटात गेले. काही दिवसांपूर्वी ते शरद पवार यांना साथ देणार असल्याची चर्चाही मतदारसंघात रंगली होती.

प्रशांत जगताप यांचा विचार करता त्यांनी शहराचे महापौर म्हणून काम केले आहे. वानवडी प्रभागात त्यांची मोठी ताकद आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षाची ताकद जगताप यांच्या मागे आहे. या मतदारसंघात मनसेचीही ठरावीक भागात मतपेढी आहे. हडपसर मतदारसंघात काही मुस्लिमबहुल भागही येत असल्याने मनसेचे उमेदवार बाबर यांच्यापुढे आव्हान असणार आहे. बाबर कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेसची मते घेणार, ही बाबही दोन्ही राष्ट्रवादीसाठी निर्णायक ठरणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही मनसे उमेदवारामुळे भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे मनसेची काही मतेही निर्णायक ठरणार आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply