पुणे : धोकादायक २३ गावांपैकी १५ गावांचे माळीणप्रमाणे कायमस्वरूपी पुनर्वसन करा; ग्रामस्थांची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

पुणे : गेल्या तीन ते चार वर्षांपासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात कमी वेळात जास्त पाऊस होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यंदा पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दरड किवा भूस्खलन होऊ शकणाऱ्या धोकादायक २३ गावांचे वेगवेगळय़ा सरकारी, खासगी संस्थांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले आहे. या धोकादायक २३ गावांपैकी १५ गावांतील ग्रामस्थांनी माळीण गावच्या धर्तीवर कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार या गावांच्या कायमस्वरुपी पूनर्वसनासंदर्भात जागा खरेदीसाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.     

 माळीण गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेला आठ वर्षे झाली आहेत. या गावाचे शेजारील आंबवडे गावातच पुनर्वसन करण्यात आले आहे. माळीणची दुर्घटना घडल्यानंतर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील २३ गावांना दरड किंवा भूस्खलन होण्याचा धोका असल्याचे समोर आले. त्यानुसार या गावांमध्ये दरडप्रतिबंधक कामे करण्यासाठी पावणेचार कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत.  त्यामध्ये मावळ तालुक्यातील ताजे, लोहगड, बोरज, तुंग, माळवाडी या पाच गावांमध्ये सपाटीकरण, संरक्षक भिती बांधणे, अस्तरीकरण, पाणी प्रवाह-साठा यांचे नियोजन करून कच्च्या घरांची दुरुस्ती, सुरक्षिततेसाठी खोल्या आदींची कामे करण्यात आली आहेत. माळीणचा हा प्रकल्प यशस्वी झाल्याने जिल्ह्यातील अन्य धोकायदायक १५ गावांतील ग्रामस्थांनी माळीणप्रमाणेच आमचेही पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे.

सर्वाधिक धोका आंबेगाव तालुक्यातील गावांना आहे. त्यामुळे या गावांनी तत्काळ दुसरीकडे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडे पुनर्वसनाची अनेक प्रकरणे प्रलंबित असून संबंधितांना जमीन देण्याबाबतची प्रकरणे रखडली आहेत. त्यातच गावांकडून स्थलांतरणाची मागणी होत असल्याने कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जमीन उपलब्धता आणि जमीन खरेदी करण्यासाठीचा निधी याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

विविध संस्थांकडून सर्वेक्षण

 माळीण दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील १४०० गावांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण भूजल सर्वेक्षण आणि विकास संचालनालय (जीएसडीए), भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) या संस्थांमार्फत प्रत्येकी दोनदा, तर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून (सीईओपी) एकदा सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे स्वतंत्र अहवाल देखील सादर करण्यात आले आहेत.

कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी करणारी १५ गावे

आंबेगाव (पाच गावे) – फूलवडे अंतर्गत भगतवाडी, जांभोरी-काळवाडी क्रमांक एक, काळवाडी क्र. दोन, पोखरी-बेढारवाडी, माळीण अंतर्गत पसारवाडी. खेड (दोन गावे) – भोरगिरी अंतर्गत पदरवस्ती, भोमाळे. मावळ (दोन गावे) – माऊ गबाळे वस्ती, माऊ मोरमाची वाडी. भोर (तीन गावे) – जांभूळवाडी (कोर्ले), मौजे पांगारी सोनारवाडी, मौजे डेहेन. मुळशी (एक गाव) – मौजे घुटके. वेल्हे (एक गाव) – मौजे आंबवणे. जुन्नर (एक गाव) – तळमाची वाडी.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply