सुपरटेक ट्विन टॉवर : नोएडातील ट्विन टॉवर पाडल्यानंतर जमा होणारा ५५ हजार टनांचा मलबा कसा हटवणार? असं असेल नियोजन!

मागील काही दिवसांपासून दिल्ली एनसीआरच्या नोएडा भागातील ट्विन टॉवरची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. कारण दिल्लीच्या कुतुब मिनारहून जास्त उंची असलेले हे दोन जुळे टॉवर अखेर आज (२८ ऑगस्ट) दुपारी जमीनदोस्त केले जाणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या दोन्ही इमारती पाडल्या जाणार आहेत.

नोएडाच्या सेक्टर ९३ मधील सुपरटेकच्या एमराल्ड कोर्ट गृहनिर्माण प्रकल्पात इमारतविषयक नियमावलीचे उल्लंघन करून हे टॉवर उभारण्यात आल्याचं न्यायालयात सिद्ध झालं आहे. त्यामुळे ४० मजल्यांच्या या दोन्ही इमारती पाडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, या अतिउंच इमारती पाडल्यानंतर त्याचा प्रचंड असा मलबा कसा व कुठे हटवला जाणार?, त्याबाबत काय नियोजन असणार याची देखील उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

कारण, या भल्या मोठ्या इमारती कोसळल्यानंतर त्या ठिकाणी तब्बल ५५ हजार टन मलबा साचेल, ज्याची जवळपास ३५ हजार घनमीटर एवढी व्याप्ती असेल. कचऱ्याचे छोटे अंश हे धूळ म्हणून हवेत मिसळतात आणि सभोवतालच्या परिसरात स्थिरावत असतात.

नोएडा नियोजन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, २१ हजार क्यूबिक मीटर मलबा शहराच्या हद्दीतील एक निश्चित केलेल्या ठिकाणी नेला जाईल आणि तिथे तो टाकला जाईल. अहवलानुसार, निश्चित केलेल्या ठिकाणचा भूखंड हा सहा हेक्टरचा आहे. तर, उर्वरती मलबा हा ट्विन टॉवरच्या ठिकाणी असेल, जिथे तो पुरण्यासाठी/साठविण्यासाठी खड्डा बनवला गेलेला आहे.

नोएडा प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक (नियोजन) इश्तियाक अहमद यांनी पीटीआयला सांगितले की, “ टॉवर उद्ध्वस्त केल्यानंतरच्या ढिगाऱ्यांचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन केले जाईल. त्यावर अंतिम निर्णय प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून घेतला जाईल. जे मलब्याच्या व्यवस्थापनावर एडिफिस इंजिनिअरिंगच्या अहवालाचे परीक्षण करत आहे. तसेच, ढिगाऱ्यातून किमान चार हजार टन लोखंड आणि पोलाद बाहेर पडण्याची अपेक्षा आहे, ज्याचा उपयोग एडिफिस इंजिनिअरिंग या इमरती उध्वस्त करण्यासाठी आलेल्या खर्चाची काही रक्कम वसूल करण्यासाठी करू शकते. याशिवाय, मलब्याचा काही भाग नोएडा प्राधिकरणाच्या सेक्टर ८० मधील बांधकाम आणि विध्वंस कचरा व्यवस्थापन प्लांटमध्ये नेला जाण्याची शक्यता आहे. या प्लांटची क्षमता दररोज ३०० टन आहे. मात्र, या ठिकाणी मलब्यावर प्रक्रिया होणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

कोणत्याही प्रकल्पात चार प्रमुख बांधकाम साहित्याचा वापर केलेला असतो, ज्यामध्ये लोखंड, काच, काँक्रीट आणि फरशीचा समावेश आहे. जेव्हा ती इमारत कोसळते तेव्हा तिच्या मलब्यातील जवळपास सर्वच लोखंडाचा पुन्हा वापर केला जातो. बांधकामासाठी वापरली जाणारी काच देखील एक अत्यंत लवचिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य सामग्री आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply