‘शेत तिथे पौष्टिक तृणधान्य’;कृषी विभागाचे राज्यात अभियान

पुणे : यंदाच्या खरीप हंगामात राज्याच्या शेतशिवारात तृणधान्यांचा सुंगध दरवळणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कोणतेही पीक घेऊ द्या. पण, शेतीच्या बांधावर, आंतरपीक, मिश्रपीक म्हणून अगदी किरकोळ प्रमाणात का होईना तृणधान्यांची लागवड करावी, यासाठी राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने ‘शेत तिथे पौष्टिक तृणधान्य’ अभियान सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यात तृणधान्यांची उपलब्धता वाढण्यासह सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारात तृणधान्यांचा समावेश होण्याची शक्यता वाढली आहे.

 सिंचनाच्या सोयी वाढल्याने आणि चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे नगदी आणि फळपिकांकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढल्यामुळे राज्यातून तृणधान्ये जवळपास हद्दपार झाली आहेत. मात्र, अलीकडे नियमित आहारातून तृणधान्ये हद्दपार झाल्यामुळे आरोग्याविषयक अनेक समस्या निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा शहरांतून तृणधान्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा तृणधान्यांच्या क्षेत्रात वाढ होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या अभियानात शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतजमिनीत वाढीस पोषक असलेल्या तृणधान्यांचे पीक निवडावे. कोरवाहू भागात बाजरी, ज्वारी, पश्चिम घाटात नाचणी, वरई, राळा पिकाला प्राधान्य द्यावे. संबंधित पिकांच्या बियाणांचे पन्नास, शंभर ग्रॅमची लहान पॅकेट तयार करून मोफत वाटप करण्यात यावे. बियाणाची उपलब्धता महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून करण्यात यावी. त्यासह स्थानिक पातळीवरील शेतकरी उत्पादक कंपन्या आणि शेतकऱ्यांकडील बियाणांचा वापर करण्यात यावा, असे आदेश कृषी संचालक विकास पाटील यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

स्थूलता कमी करण्यासाठी, वजन नियंत्रणात राहण्यासाठी, अन्नपचन व्यवस्था चांगली राहण्यासाठी, मधुमेहाचा धोका कमी होण्यासाठी आणि मधुमेही रुग्णांमधील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी तृणधान्यांचा मोठा उपयोग होतो. हृदयरोग, उच्च रक्तदाब, लकवा, कर्करोगावर तृणधान्यांतील तंतुमय पदार्थ उपयोगी ठरतात. तृणधान्यात मॅग्नेशियम, कॉपर, झिंक, फॉस्फरस ही सूक्ष्म पोषक द्रव्ये असतात. ही सूक्ष्मद्रव्ये स्नायू, हाडे बळकट करतात. गरोदर माता, स्तनदा मातांच्या आहारात तृणधान्यांचा समावेश गरजेचा आहे.

– डॉ. अर्चना ठोंबरे, आहारतज्ज्ञ

तृणधान्यांच्या लागवडीमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या आहारात तृणधान्यांचा समावेश होईल. बाजारात तृणधान्यांची उपलब्धता वाढेल. मिश्रपीक पद्धतीचा फायदा म्हणून परागीकरण, कीड नियंत्रण चांगले होईल. जमिनीचा कस कायम राहील. शेतीतील आणि पर्यावरणीय वैविध्यता जपली जाईल.

– विकास पाटील, कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण)



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply