मुंबई-पुण्यासह राजधानी दिल्लीत प्रदूषण कमी; पावसाळी स्थितीत हवेची गुणवत्ता उत्तम

पुणे : राज्यात पावसाळी स्थितीमुळे नागरिकांना हैराण केले असले, तरी गेल्या काही दिवसांपासून यात वातावरणामुळे हवेची गुणवत्ता उत्तम स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश वेळेला ‘वाईट’ या गटात असलेली मुंबई आणि पुण्याची हवा आठवडय़ापासून ‘उत्तम’ गटात मोडते आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या आणि नेहमीच हवा धोकादायक गटात असलेल्या दिल्लीतही सध्या काही प्रमाणात काही होईना शुद्ध आणि समाधानकारक हवा मिळत आहे.

भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेच्या ‘सफर’च्या वतीने घेण्यात येत असलेल्या नोंदींवरून ही बाब स्पष्ट होत आहे. सफर संस्थेच्या वतीने शहराच्या विविध भागांतील आणि प्रामुख्याने मोठी रहदारी असलेल्या ठिकाणच्या हवेच्या गुणवत्तेच्या नोंदी दररोज घेतल्या जातात. पीएम २.५ आणि पीएम १० (पार्टीक्युलेट मॅटर) या अतिसूक्ष्म कणांचे हवेतील प्रमाण सातत्याने तपासले जाते. त्यानुसार १०० पर्यंतची अतिसूक्ष्म कणांची पातळी उत्तम समजली जाते. त्यानंतर १०० ते २०० समाधानकारक, २०० ते ३०० वाईट, ३०० ते ४०० अत्यंत वाईट, तर ४०० ते ५०० या प्रमाणात अतिसूक्ष्म कणांची हवेतील पातळी ही अतिधोकादायक समजली जाते. त्यानुसार गेल्या अनेक दिवसांत राज्यातील प्रमुख शहरांतील हवा उत्तम गटात आहे. पावसाळी वातावरणामध्ये हवेत पसरणारे धुळीच्या अतिसूक्ष्म कणांचे प्रमाण आपोआपच कमी होते. त्यातून हवेती गुणवत्ता सुधारण्यास मदत होत असते. त्यानुसार मुंबई, पुण्यासह विविध शहरांत हवेतील प्रदूषित कणांचे प्रमाण कमी झाले आहे.

मुंबई शहरातील हवेची सरासरी गुणवत्ता गुरुवारी (१३ ऑक्टोबर) उत्तम स्थितीत (६२) होती. मुंबईपेक्षा पुण्याची स्थिती चांगली असून, हवेतील अतिसूक्ष्म कणांची पातळी केवळ ४७ म्हणजेच उत्तम स्थितीतच होती. या दोन्ही शहरातील ही पातळी अनेकदा दोनशेच्याही वर असते. हवेतील प्रदूषणकारी कणांचे प्रमाण नेहमीच वाईट आणि अनेकदा अतिधोकादायक पातळीवर असणाऱ्या दिल्लीमध्येही गेल्या काही दिवसांत हवा उत्तम असून, गुरुवारी प्रदूषणकारी कणांची हवेतील पातळी दिल्लीत ११९ म्हणजे समाधानकारक गटात होती.

मुंबईतील सरासरी हवेची गुणवत्ता उत्तम स्थितीत असली, तरी बीकेसी आणि नवी मुंबई भागांत हवेतील अतिसूक्ष्म कणांचे प्रमाण किंचित जास्त आहे. अशीच स्थिती पुण्यात शिवाजीनगर आणि कोथरूड भागांत दिसून येते. दिल्लीतील मथुरा रस्ता, नोयडा आणि दिल्ली विद्यापीठ परिसरातही हवेतील प्रदूषणकारी कणांचे प्रमाण काहीसे अधिक आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply