मुंबईच्या हवामानात सुधारणा

मुंबई : कोरोना टाळेबंदीचा एकीकडे सर्वांना मोठा आर्थिक फटका बसला असताना, दुसरीकडे या कडक टाळेबंदीचा मुंबईच्या हवामानाला मात्र फायदा झाल्याचे समोर आले आहे. या टाळेबंदीमुळे २०२१ मध्ये मुंबईतील हवेचा दर्जा काहीसा सुधारला. मुंबईत २०२१ मध्ये हवेतील `पीएम २.५`चे प्रमाण ४६.४ मायक्रोग्रॅम घनमीटर एवढे झाले आहे जे २०२० मध्ये ४१.३ मायक्रोग्रॅम घनमीटर एवढे होते. त्यामुळे जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये ७७ व्या स्थानावर असणारी मुंबई आता १२४ व्या स्थानावर आली आहे.

स्वित्झर्लंड येथील `आयक्यू एअर टुडे`ने २०२१च्या जागतिक वायू गुणवत्ता अहवालात मुंबईच्या हवामानाबाबतची सकारात्मक बाब नमूद केली आहे. २०२१ मध्ये जागतिक पातळीवरील २० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी भारतातील १४ शहरे आहेत. यात राजस्थानातील भिवडी (रँक १), गाझियाबाद (२), दिल्ली (४), जौनपूर (५), नोएडा (७), भागवत (१०) ही शहरे `टॉप १०`मध्ये आहेत.

भारतातील मेगासिटीजमध्ये, कोलकातामध्ये हवेतील `पीएम २.५`चे प्रमाण ५९ मायक्रोग्रॅम घनमीटर असून, हे शहर ६० व्या स्थानावर आहे. त्यानंतर मुंबई ४६.४ मायक्रोग्रॅम घनमीटरसह १२४ क्रमांकावर आहे. तर हैदराबाद (३९.४ मायक्रोग्रॅम घनमीटर), बेंगळुरू (२९ मायक्रोग्रॅम घनमीटर) आणि चेन्नई (२५.२ मायक्रोग्रॅम घनमीटर) ही शहरे अनुक्रमे २३२, ५०५ आणि ६८१ क्रमांकावर आहेत. तर मुंबईला लागून असलेले नवी मुंबई हे शहर (५६ मायक्रोग्रॅम घनमीटर) जागतिक स्तरावर ७१ व्या क्रमांकावर आहे.

१५ पैकी ११ प्रदूषित शहरे भारतातील

1 भारताचे वार्षिक सरासरी `पीएम २.५`चे प्रमाण ५८ मायक्रोग्रॅम घनमीटर असून, बांगलादेश, चीन, तझाकिस्तान आणि पाकिस्ताननंतर जगातील पाचवा सर्वात प्रदूषित देश ठरला आहे. २०२१ मध्ये मध्य आणि दक्षिण आशियातील १५ सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी ११ शहरे भारतात होती. भारतातील कोणत्याही शहराने ५ मायक्रोग्रॅम घनमीटरची जागतिक आरोग्य संघटनेची हवा गुणवत्ता मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण केलेली नाहीत.

2 २०२१ मध्ये भारतातील ४८ टक्क्यांपेक्षा अधिक शहरांनी ५० मायक्रोग्रॅम घनमीटरपेक्षा जास्त किंवा जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या १० पट जास्त पातळी ओलांडली आहे. कोविड काळातील टाळेबंदी, निर्बंध आणि आर्थिक मंदी यामुळे केवळ वायू प्रदूषणाच्या पातळीवर आधारित राष्ट्रीय स्वच्छ वायू कृती योजनेचा प्रभाव निश्चित करणे अवघड झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

मुंबईतील `पीएम २.५`ची पातळी राष्ट्रीय सुरक्षित पातळीच्या जवळ आली असली तरी ती जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांपेक्षा तीनपट जास्त दर्शवली आहे. आयक्यूएअरच्या अहवालानुसार २०२१ मध्ये वायू प्रदूषण आणखीनच बिघडले, जे २०१८ मध्ये नोंदवलेल्या धोकादायक पातळीकडे झपाट्याने पोहोचत आहे. मुंबई स्वच्छ हवा कृती योजनेअंतर्गत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. राज्य सरकारने हवेच्या प्रदूषणाचा मुकाबला करण्यासाठी आपले प्रयत्न वाढवले ​​पाहिजेत.

- भगवान केसभट, संस्थापक, वातावरण फाऊंडेशन



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply