पुणे : सिंहगडावरील चोरीचा लागला तपास; सहा जणांना पकडले, दोन दिवस पोलिस कोठडी

खडकवासला : सिंहगडावरील कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जात होता. त्यातील साडे सात लाख रुपये किंमतीचे साहित्य २२ डिसेंबर रोजी चोरीला गेले होते, ती घटना उघड झाली आहे. यातील हवेली पोलिसांनी चोरी करणाऱ्या सहा जणांना पकडले आहे. त्यांना आज शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी दिली आहे.

चोरीची घटना घडल्यानंतर १५ दिवसानंतर ही चोरीच्या तपासात प्रगती न झाल्याने आमदार भीमराव तापकीर यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हवेली पोलीस ठाण्यात जाऊन तपासाची माहिती घेतली होती. तपासाबाबत नाराजी व्यक्त करीत ग्रामीण पोलिस अधीक्षकांना पत्र दिले होते.

सिंहगडावर भांबुर्डा वन विभागाच्या वतीने कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जात होता. यासाठी साडे सात लाख रुपये किंमतीचे नवीन साहित्य खरेदी केले होते. ते साहित्य गडावर आणून ठेवले होते. प्रकल्प अद्याप सुरू झालेला नव्हता. त्यापूर्वीच त्याचे साहित्य गडावरून २२ डिसेंबर रोजी चोरीला गेल्याचे उघड झाले होते. हवेली पोलिसांनी सखोल तपास करीत ही चोरी उघडकीस आणली आहे. त्या प्रकरणी सहा जणांना अटक केली आहे.

चोरीची घटना घडल्यावर वन विभागाने त्याच दिवशी म्हणजे २२ डिसेंबर रोजी हवेली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यात हवेली पोलिसांनी सिंहगडावरील वन विभागाचे कर्मचारी, सुरक्षारक्षक यांच्याकडे चौकशी केली होती.

त्यानंतर, मागील आठवड्यात भाजपचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी हवेली पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती. त्यावेळी, तपास योग्य दिशेने सुरू असल्याने आंदोलन स्थगित केले होते. त्यानंतर, हवेली पोलिस ठाण्याची व स्थानिक गुन्हे शाखेची यंत्रणा कामाला लागली. त्यांनी याबाबत सखोल तपास केला. सीसीटीव्ही फुटेज यासह, सर्व बाजुंनी तपास करीत चोरीच्या घटनेचा तपास करीत सहा जणांना पकडले.

सिंहगडावर कचरा प्रकल्प उभारताना यामध्ये वनविभागाच्या अनेक गंभीर चुका झाल्या आहेत. म्हणून शिवप्रेमी संघटना व स्थानिकांनी आमदार भीमराव तापकीर यांचे या घटनेकडे पोलिसांचे लक्ष वेधले होते.कचरा प्रक्रिया प्रकल्प व चोरीच्या या घटनेबाबत आमदार तापकीर यांनी पोलिस ठाण्याला पत्र दिले आहे. त्यात त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्रत्यक्षात प्रकल्प कोणाची सूचना, मागणीनुसार होता, कोणत्या योजना उपक्रमातून सुरु होता. याची स्थानिक गावकऱ्यांना माहिती नव्हती. प्रकल्पाचे उभारणीचे काम पुर्ण होऊन प्रकल्प सुरू झाला की नाही, हे ही अद्याप स्पष्ट न झालेले नाही. ठेकेदार प्रकल्प उभारत आहे की, हा प्रकल्प उभारून संबंधित ठेकेदाराने तो वनविभाग किंवा वनसंरक्षण समिती घेरा सिंहगडकडे सुपुर्द केला होता. त्यानंतर ही सामुग्री चोरीला गेली. याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून वनसंरक्षण समिती उपद्रव शुल्क जमा करते. त्यामुळे जमा उपद्रव शुल्काचा विनियोग योग्य प्रकारे होणे गरजेचे आहे.

चोरीची ही घटना मोठी आहे. क्रेन ने उसतरवलेले साहित्य चोरीला कसे गेले, ते कसे नेले. कोणी नेले, असे अनेक प्रश्न होते, चोरी करणाऱ्यांना पकडल्याने याची उत्तरे मिळतील. त्याचबरोबर, सिंहगडावर आकाशवाणी, दुरदर्शन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची इतर शासकीय इमारती कार्यालये आहेत. सिंहगड किल्ल्याची एकुणच सुरक्षा व्यवस्था खुपच महत्त्वाची आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply