पुणे – पर्यायी इंधनाबाबतची यंत्रणा निर्माण करावी लागेल

पुणे - देशातील मोबिलिटी क्षेत्र सध्या झपाट्याने बदलत असून त्यात पुणे महत्त्वाचे स्थान बजावत आहे. येत्या काळात देशातील वाहन व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात पर्यायी इंधनाचा वापर करेल. त्यामुळे पर्यायी इंधनाबाबतची यंत्रणा देखील निर्माण करावी लागेल. या क्षेत्राला आवश्‍यक असलेले कुशल कौशल्य निर्माण करण्यासाठी आपल्याला आपली शिक्षण व्यवस्था बदलून अपडेट करावी लागेल, असे मत ‘पुणे पर्यायी इंधन परिषदेच्या’ चर्चासत्रात पर्यायी इंधन आणि वाहन व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सोमवारी (ता. ४) व्यक्त केले.

राज्य सरकार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) संयुक्त विद्यमाने आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) सहकार्याने आयोजित या परिषदेत ‘देशातील मोबिलिटी क्षेत्राचे भविष्य’ या विषयावर चर्चासत्र आयोजन करण्यात आले होते. ‘प्राज इंडस्ट्रीज’चे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, ‘केपीआयटी’चे अध्यक्ष रवी पंडित, ‘मर्सिडीज बेंझ’चे उपाध्यक्ष शेखर भिडे, ‘इका’चे अध्यक्ष सुधीर मेहता आणि राज्याच्या परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह या चर्चासत्रात सहभागी झाले होते. रेलिस्कोअर सह-संस्थापक अमित परांजपे यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘देशातील वाहन क्षेत्राचा विचार करता बायोमोबिलिटी देखील महत्त्वाची आहे. सध्या अनेक उद्योग व्यवसाय हे वाहन उद्योगांवर अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उत्पादन कमी झाले तर काय होईल याची कल्पना सर्वांना आहे. २०५० पर्यंत देशातील ३० ते ४० टक्के प्रमाणात पेट्रोल डिझेलच्या ऐवजी इथेनॉल वापरले जार्इल. पर्यायी इंधनाच्याबाबत सरकार देखील प्रयत्नशील आहे.

पंडित म्हणाले, ‘‘इलेक्ट्रॉनिक वाहनांची मागणी आणि उत्पादन वाढले आहे. तसेच शहरात र्इ-बार्इक आणि लार्इट वेट वाहने दिसू लागली आहेत.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी बॅटरीसह इतर पर्यायांचा विचार करावा लागेल. त्यात हायड्रोजन हा चांगला पर्याय आहे. आपण हायड्रोजन निर्यात करू शकतो एवढी क्षमता आपल्यात आहे. पर्यायी इंधनाचा वापर करताना त्याबाबतची सर्व यंत्रणा निर्माण करावी लागते. सध्या वाहन क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. सिंह म्हणाले, ‘‘कोणताही बदल होत असतात त्यासाठी योग्य व्यवस्थापन हवे असते. भविष्याचा विचार करता कोणते कौशल्य आपल्याला लागणार आहे. याचा विचार करून धोरणे तयार करायला हवी. त्याबाबतचे नियोजन सुरू आहे. शेती किंवा औद्योगिक क्षेत्रात पर्यायी इंधनाचे बदल करणे लगेच शक्य नाही. पण भविष्यात याचा विचार करावा लागेल. मेहता यांनी देखील आपले विचार मांडले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply