पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठीच्या ४० टक्के जमिनीचे मूल्यांकन पूर्ण; वर्तुळाकार रस्त्याचे ६० टक्के मूल्यांकन पूर्ण

पुणे : पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या ४० टक्के जमिनींचे मूल्यांकन पूर्ण करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कार्पोरेशन – एमएसआरडीसी) करण्यात येणाऱ्या वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींचे ६० टक्के मूल्यांकन नगररचना विभागाकडून पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांसाठी स्वेच्छेने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने त्यांचा मोबदला मिळू शकणार आहे.

पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पातील ५४ पैकी ४० गावांची मोजणी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. हा प्रकल्प पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतून जाणार असून त्यापैकी ५० टक्के जमीन पुणे जिल्ह्यातील संपादित करण्यात येणार आहे. उर्वरित ५० टक्के जमीन नगर आणि नाशिक जिल्ह्यातील असल्याने पुण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. या प्रकल्पात स्वेच्छेने जमीन देणाऱ्यांचे खरेदीखतही करण्यास सुरूवात झाली आहे. प्रकल्पासाठी १०० कोटींचा निधी प्राप्त झाल्याने येत्या ऑक्टोबरअखेर १०० टक्के भूसंपादनाचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

याबाबत बोलताना नगररचना पुणे विभागाचे सहायक संचालक अभिजित केतकर म्हणाले, ‘पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पातील हवेलीतील १२ पैकी चार गावांची मूल्यांकन पूर्ण झाले आहे. खेडमधील संपादित करण्यात येणाऱ्या सर्व जमिनींचे मूल्यांकन पूर्ण केले असून जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील संपादित करण्यात येणाऱ्या जमिनींचे मूल्यांकन अद्याप बाकी आहे. तसेच रस्ते महामंडळाच्या वर्तुळाकार प्रकल्पातील पश्चिम मार्गाचे ५० टक्के, तर पूर्व भागाचे ३० टक्के मूल्यांकन पूर्ण केले आहे. त्यामध्ये मावळातील सहा गावांचे म्हणजेच १०० टक्के दर निश्चित केले आहेत. हवेलीतील ११ पैकी सहा गावांमधील दर निश्चित केले आहेत, तर मुळशीतील पाच गावांचे दर निश्चितीकरण अंतिम टप्प्यात आहे.’

रेल्वे प्रकल्पाची वैशिष्टय़े

  • रेल्वेचा वेग प्रतितास २०० कि.मी.
  • १८ बोगदे, ४१ उड्डाणपूल, १२८ भुयारी मार्ग
  • विद्युतीकरणासह एकाच वेळी दुहेरी रेल्वे मार्गाचे काम
  • ६० टक्के वित्तीय संस्था, राज्य सरकार आणि रेल्वे प्रत्येकी २० टक्के खर्चाचा वाटा

वर्तुळाकार प्रकल्पाचा आढावा

  • पश्चिम भागातील चार तालुक्यांतील ३७ गावांतून जाणार
  • ६९५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन
  • मोजणीचे काम २१ जुलैपासून सुरू
  • पश्चिम मार्गातील ३७ पैकी ३६ गावांतील, तर पूर्व मार्गातील ४६ पैकी २६ गावांची मोजणी पूर्ण
  • स्वेच्छेने जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना पाचपट मोबदला


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply