पुणे : अति पावसामुळे गुऱ्हाळघरांमधील लगबग थंडावली

पुणे : अति पावसामुळे कराड, शिराळा, कोल्हापूर परिसरातील गुऱ्हाळ घरांमधील लगबग थंडावली आहे. माघारी मोसमी पावसाचाही जोर कायम असल्यामुळे शिराळा परिसरात उसाच्या शेतात अजूनही काही ठिकाणी गुडघाभर पाणी आहे. त्यामुळे ऊसतोडणी इतका वाफसा येण्यासाठी किमान महिनाभराचा काळ जावा लागणार आहे. साधारणपणे दिवाळीत गुऱ्हाळघरे सुरू होतात. पण, यंदा गुऱ्हाळघरांची चुलवाणे पेटण्यासाठी नोव्हेंबरअखेर उजाडणार आहे.

यंदा राज्यात सर्वदूर मोसमी पाऊस बरसला आहे. आता माघारी मोसमी पाऊसही जोरदार बरसतो आहे. सातारा, कराड, शिराळा आणि कोल्हापूर परिसरातही जोर कायम आहे. कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीकाठावरील उसाच्या शेतात अद्याप गुघडाभर पाणी आहे. उसाच्या शेतातील चिखल पाहता, यापुढे पाऊस न झाल्यास किमान महिनाभर ऊसतोडणीसाठी वाफसा येणार नाही. त्यामुळे गूळ हंगाम किमान महिनाभर पुढे गेला आहे. पाऊस थांबल्यास नोव्हेंबरअखेर गूळ हंगाम सुरू होईल.

कराड, शिराळा, कोल्हापूर हा पट्टा पश्चिम महाराष्ट्रातील दर्जेदार, निर्यातक्षम गूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या ऊसपट्ट्यात गुऱ्हाळघरांची संख्या मोठी आहे. शिवाय येथे साखर कारखान्यांची संख्या आणि क्षमताही मोठी आहे. त्यामुळे उसाला मागणी असते. तरीही काही शेतकरी चांगला दर मिळतो म्हणून गूळ उत्पादन करताना दिसतात.

वारणाकाठावरील गुऱ्हाळघरांचे वैभव लयास
वारणा नदीकाठावर म्हणजे शिराळा तालुक्यात पाच वर्षांपूर्वी सुमारे पन्नासहून अधिक गुऱ्हाळघरे होती. मागील काही वर्षांपासून वारणा नदीला सातत्याने महापूर येत असल्यामुळे नदीकाठावरील गुऱ्हाळघरांचे मोठे नुकसान झाले आहे. ही गुऱ्हाळघरे पुन्हा उभी राहू शकली नाहीत. गुऱ्हाळघरांमध्ये काम करण्यासाठी, ऊसतोडणीसाठी माणसं मिळत नाहीत. कामगार आणून ठेवले आणि पाऊस बंद झाला नाही तर कामगारांवर फुकट पैसे खर्च करावे लागतात आणि गडबड करून कामगार नाही आणले तर ते साखर कारखान्यांवर निघून जातात. त्यामुळे पुन्हा कामगार मिळत नाहीत, अशी अवस्था आहे. या सर्व अडचणींमुळे आता फक्त कंदूर (ता. शिराळा) परिसरात दोन-तीन गुऱ्हाळघरे सुरू होतात. तीही पूर्ण क्षमतेने गूळ उत्पादन करीत नाहीत, अशी माहिती कंदूर येथील गूळ उत्पादक सुभाष पाटील यांनी दिली.

साखर कारखान्यांचा हंगामही लाबणीवर पडणार
राज्यात पंधरा ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचे नियोजन असले, तरीही पंधरा तारखेपासून हंगाम जोमाने सुरू होईल, अशी स्थिती नाही. दिवाळी तोंडावर असल्यामुळे कामगार घरात दिवाळी साजरी करूनच कारखान्यांवर जातील, अशी स्थिती आहे. त्यामुळे ऑक्टोबरअखेर उजाडणार आहे. शिवाय उसाच्या शेतात पाणी साचून असल्याने ऊसतोडणी यंत्राचा वापर करणेही शक्य होणार नाही. त्यामुळे साखर कारखान्यांचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत गती घेण्याची शक्यता कमीच आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply