Monkeypox Case in India: भारतात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण, विदेशातून परतला होता

नवी दिल्ली: देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. आतापर्यंत ६३ देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, भारतात आतापर्यंत रुग्ण सापडला नव्हता. मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळला आहे. हा रुग्ण विदेशातून भारतात परतला होता.

केरळच्या कोल्लममध्ये मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, परदेशातून परतलेल्या व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात आले होते. तत्पूर्वी एका दिवसाआधीच केंद्र सरकारने सर्व राज्यांना पत्र पाठवून मंकीपॉक्सचा धोका लक्षात घेऊन खबरदारी म्हणून सावध केलं होतं. तसेच आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.

केंद्र सरकारकडून गाइडलाइन्स जारी

मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण देशात आढळला आहे. तत्पूर्वी, खबरदारी म्हणून केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. सर्व संशयित रुग्णांवर लक्ष ठेवणे आणि त्यांच्या तपासण्या करायला हव्यात. तसेच त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

संसर्ग झालेल्या आणि संशयित रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवावे. तसेच मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना वेळेवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करावी. या आजाराची लक्षणे दिसून येण्यासाठी सहा ते १३ दिवसांचा कालावधी लागतो. हा विषाणू गंभीर नाही, मात्र, त्यावर अद्याप कोणतेही यशस्वी उपचार होऊ शकलेले नाहीत.

काय आहेत मंकीपॉक्सची लक्षणे

मंकीपॉक्सची लक्षणे सहा ते १३ दिवसांत दिसू लागतात. त्यात रुग्णाला ताप, डोकेदुखी, पाठ आणि मांसपेशीमध्ये वेदना, तसेच थकवा येतो. सर्वात आधी हात आणि पायांवर मोठमोठ्या पुरळ येतात. गंभीर संसर्ग झाल्यास या पुरळ दोन्ही डोळ्यांच्या बाहुलीच्या पारदर्शक पडद्यावर येऊ लागतात.

मंकीपॉक्स कसा पसरतो?

सर्वसाधारणपणे मंकीपॉक्स विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरण्याचा धोका कमी असतो. मात्र, कधीकधी रुग्णाला खोकला आल्यानंतर त्याच्या तोंडातून उडणाऱ्या द्रवामध्ये विषाणू असू शकतात. त्यातून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता असते. अशावेळी कोविडसारखाच एका रुग्णाकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. तसेच विषाणूचा संसर्ग झालेल्या बाधित जनावरांच्या रक्तातून किंवा विशिष्ट त्वचेच्या संपर्कात आल्याने एखाद्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply