जळगाव : वेटिंग तिकीट आता रेल्वे गाडीतच होणार कन्फर्म

जळगाव : रेल्वेचा प्रवास करताना अनेकांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. यामुळे प्रवाशांना वेटिंगचे तिकीट घ्यावे लागते. गाडीत अनेक वेळा टीसीकडे विनंत्या कराव्या लागतात. तरीही तिकीट कन्फर्म  होत नाही. अन्‌ प्रवाशांचे हाल होतात. यामुळे रेल्वेने आता रेल्वेतच तिकीट कन्फर्म करण्याचा निर्णय घेतला आहे. आता धावत्या रेल्वेतच वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना आता कन्फर्म सीट दिले जाणार आहे. 

भुसावळ विभागातून धावणाऱ्या अमरावती-मुंबई एक्स्प्रेसमध्ये हा प्रयोग सुरू झाला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात १० ‘हॅण्ड होल्ड टर्मिनल’ (एचएचटी) मशिन भुसावळ विभागाला प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती रेल्वेचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुनिल मिश्रा यांनी दिली. गाडीतच तिकीट कन्फर्म करण्याचे काम आता रेल्वेतील तिकीट निरीक्षकाकडे असेल. त्यासाठी ४५४ ‘हॅण्ड होल्ड टर्मिनल’ मशिनची मागणी नोंदवण्यात आली आहे. रेल्वेत कन्फर्म तिकिटासाठी या यंत्राचा वापर होईल.

असे होईल कन्फर्म तिकीट

रेल्वेचा प्रवास सुरू झाल्यानंतर धावत्या रेल्वेत एखादे बर्थ (सीट) रिकामे असल्यास गाडीतील तिकीट निरीक्षक त्याची एचएचटी मशीनमध्ये नोंद घेईल. त्या प्रवाशाच्या बोर्डिंग स्टेशनपासून एक ते दोन स्टेशनपर्यंत प्रतीक्षा करेल. मात्र, बराच वेळ होऊनही बर्थ रिकामाच राहिल्यास त्याची नोंद घेऊन, रिकामा बर्थ प्रतीक्षा यादीतील पुढील प्रवाशाला दिला जाईल. ही सर्व प्रक्रिया एचएचटी मशीनद्वारे ऑनलाइन पद्धतीने पार पाडली जाणार आहे. प्रतीक्षा यादीत सर्वात पुढे असलेल्या प्रवाशाला ते बर्थ आपोआप दिले जाईल. तसा ‘एमएमएस’ संबंधित प्रवाशाच्या मोबाईलवर पाठवला जाईल. ही सर्व प्रक्रिया होणार ऑनलाइन होणार आहे.

दंडाच्या पावत्यांची ऑनलाइन नोंद

प्रवासादरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना तपासणीसाकडून दंडाच्या लिखित पावत्या दिल्या जातात. जनरलचे तिकीट काढून स्लीपर बोगीत बसणाऱ्यांनाही अतिरिक्त प्रवास शुल्काची पावती घ्यावी लागते. विविध कारणांसाठी तिकीट तपासणीसाला पावत्या फाडाव्या लागतात. हे काम आता ‘एचएचटी’ यंत्राद्वारे केले जाईल. ही यंत्रे ऑनलाइन प्रणालीद्वारे रेल्वेच्या सर्व्हरला जोडलेली असतील. प्रवाशाने पैसे दिल्यानंतर यंत्रातून त्याची पावती निघेल. त्याची ऑनलाइन नोंद रेल्वेकडे होईल. रेल्वेच्या अन्य विभागात ही यंत्रे यापूर्वी दाखल झाली असली तरी भुसावळ विभागात मात्र ८ जुलैपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. भुसाव‌ळ विभागात अमरावती-मुंबई ही पहिली गाडी यामुळे डिजिटल झाली आहे.

.

 

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply