कॅप्टन जडेजाने पहिला विजय धोनी नाही तर ‘या’ व्यक्तीला केला समर्पित

नवी मुंबई : चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या 15 व्या हंगामातील पहिला वहिला विजय मंगळवारी आरसीबीला 23 धावांनी पराभूत करत साजरा केला. विशेष म्हणजे हा विजय सलग चार पराभवामुळे आला होता. त्यामुळे या विजयाची गोडी काही न्यारीच असणार आहे. दरम्यान, सामना जिंकल्यानंतर सीएसकेचा कर्णधार रवींद्र जडेजाने आपला कर्णधार म्हणून पहिला विजय आपल्या पत्नीच्या चरणी वाहिला. याचबरोबर जडेजाने मी अजून शिकाऊ कर्णधार असल्याचीही कबुली दिली. चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर बेंगलोरसमोर 216 धावा उभारल्या होत्या. मात्र त्याच्या प्रत्युत्तरात आरसीबीला 20 षटकात 9 बाद 217 धावाच करता आल्या.

कर्णधार म्हणून मिळवलेल्या आपल्या पहिल्या वहिल्या विजयानंतर रविंद्र जडेजाने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'सर्वात प्रथम माझा कर्णधार म्हणून हा सर्वात पहिला विजय आहे. या विजय मी माझ्या पत्नीला समर्पित करू इच्छितो. कारण पहिला विजय हा कायम खास असतो.' रविंद्र जडेजा पुढे म्हणाला की, 'पहिल्या चार सामन्यात आम्हाला विजय मिळवता आले नाही. मात्र एक संघ म्हणून आम्ही तगडे होतो. एक कर्णधार म्हणून मी अजूनही माझ्या वरिष्ठ खेळाडूंकडून शिकतोय. माही भाईशी मी सातत्याने चर्चा करतोय.'

रवींद्र जडेजा आपल्या संघातील नव्या भुमिकेविषयी सांगताना म्हणतो की, 'नव्या भुमिकेत रूळण्यासाठी मला थोडा वेळ लागेल. मी अजूनही शिकण्याचा प्रयत्न करत आहे आणि प्रत्येक सामन्यागणिक माझ्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे.'

सलग चार पराभवाबद्दल जडेजा म्हणतो की, 'आमचे व्यवस्थापन माझ्यावर दबाव टाकत नाही. ते निवांत आहेत. ते कायम माझ्याजवळ येतात आणि मला प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतात. आमच्या ड्रेसिंग रूममध्ये अनेक अनुभवी खेळाडू आहेत. त्याचा अनुभव कामी येतो. आम्ही पॅनिक होत नाही. आम्ही आम्हाला कायम शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतो. आता आम्ही विजयी ट्रॅकवर परतलो आहे.'



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply