आण्विक संम्मीलन तंत्रज्ञानावर पुण्यात होणार संशोधन

 

पुणे : आण्विक संम्मीलन (न्युक्लिअर फ्युजन) तंत्रज्ञानावर आधारित अणुऊर्जा प्रकल्प पुण्यात उभारण्याचा मानस डी.वाय.पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ (अभिमत) आणि अल्बॉट टेक्नॉलॉजीने व्यक्त केला आहे. यासाठी आवश्यक तंत्रज्ञानावर ‘प्रोजेक्ट संलयन’च्या माध्यमातून संशोधन करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रभात रंजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अमेरिकेतील अल्बॉट टेक्नॉलॉजीचे डॉ. आकाश सिंग उपस्थित होते.

खासगी भागीदारीतून देशात अशी अणुभट्टी उभारण्याचा हा पहिला प्रकल्प आहे. प्रा. रंजन म्हणाले, ‘‘या प्रकल्पाच्या माध्यमातून भविष्यात स्वच्छ विद्युतउर्जेच्या निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे. या अणुभट्टीतून तयार होणारे न्यूट्रीनोंद्वारे वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक रेडिओ आयसोटोपचे उत्पादन घेण्याचा आमचा मानस आहे. आण्विक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठीही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.’’ गुजरात येथील इन्स्टिट्यूट ऑफ प्लाझ्मा रीसर्च येथील टोकोमॅक प्रकारातील अणुभट्टीच्या धरतीवरच ही अणुभट्टी उभारण्यात येणार असल्याचे प्रा. रंजन यांनी सांगितले.

डॉ. सिंग म्हणाले, ‘‘या प्रकल्पासाठी बीजराशी म्हणून १० लाख डॉलरचा निधी आम्ही देत आहे. यासाठी १५ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता असून, एकूण खर्च २ ते ३ अब्ज डॉलर अपेक्षीत आहे. यासाठी भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदारांचा सहभाग घेण्यात येणार आहे.’’ येत्या १५ वर्षांत ५०० मेगा वॉट एवढ्या ऊर्जेची निर्मितीचा मानस असून, शाश्वत आणि सुरक्षित ऊर्जेसाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचा दावा डॉ. रंजन यांनी केला.

आण्विक संम्मीलन : दोन किंवा त्यापेक्षा अधिक अणुकेंद्र एकत्र येत एकच अणुकेंद्र तयार करतात, त्याला आपण आण्विक संम्मीलन (न्यूक्लिअर फ्यूजन) असे म्हणतो. या अभिक्रियेतून न्यूट्रॉन्स आणि प्रोट्रॉन्सची निर्मिती होते. सुर्यामध्येही हायड्रोजन आणि हेलीयम या मुलद्रव्यांमध्ये ही अभिक्रिया घडते. त्यातून मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची निर्मिती होते. या प्रकल्पासाठी ड्यूटेरीयम आणि हेलीयमच्या अणुकेंद्रकांसोबत ही अभिक्रिया घडविण्याचा मानस आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या अणुभट्ट्या या आण्विक विकेंद्रीकरणावर (न्यूक्लिअर फिशन) आधारीत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply