मुंबई : मिठी नदीच्या प्रदूषणाचा विळखा सुटणार

मुंबई: आजही मिठी नदीत सांडपाणी आणि रासायनिक पाणी बिनदिक्कत सोडले जात आहे. परिणामी २६ जुलै २००५ पासून आजमितीस मिठी नदीच्या सुशोभीकरण आणि विकासाच्या नावाखाली ११५० कोटी खर्च करूनही ती साफ झालेली नाही. पालिकेतर्फे मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी आता अडवले जाणार आहे. त्यासाठी नियोजन केल्याची माहिती पालिकेने आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.

मिठी नदीत दोन्ही बाजूंकडून उत्सर्जित होणाऱ्या सांडपाण्याबाबत गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. मुंबई पालिकेमार्फत मिठी नदीतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सल्लागार मे. फ्रिशमन प्रभू यांची नेमणूक करण्यात आली होती. सल्लागाराने सादर केलेल्या तांत्रिक व व्यवहार्यता अहवालानुसार अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत कामे सुचवण्यात आली आहेत. त्यानुसार अल्प मुदतीच्या उपाययोजनांमध्ये गट क्र. १ अंतर्गत पवई फिल्टरपाडा ते डब्ल्यू. एस. पी. कम्पाऊंडदरम्यान नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवले जाणार आहे. ते मिठी किनाऱ्यालगत नियोजित मलनिःसारण वाहिन्यांद्वारे वाहून नेऊन डब्ल्यूएसपी कम्पाऊंडमध्ये प्रस्तावित आठ दशलक्ष घनलिटर एवढ्या क्षमतेच्या मलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. संबंधित काम मे २०२२ पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे, असे पर्जन्य जलवाहिनी विभागाचे उपप्रमुख अभियंता विभाष आचरेकर यांनी कळवले आहे.

सल्लागाराने सुचवलेल्या दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांनुसार गट क्र. २ अंतर्गत मुख्यतः (भरतीप्रवण क्षेत्र वगळता) छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळवणे तसेच मिठी नदीचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे इत्यादी कामांचा अंतर्भाव आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. गट क्र. ३ अंतर्गत भरतीप्रवण क्षेत्रातील मिठी नदी व वाकोला नदीत विविध पातमुखांद्वारे उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळवण्यात येणार आहे. गट क्र. ४ अंतर्गत मुख्यतः मरोळ-बापट नाला व सफेद पूल नाला अशा दोन पातमुखांद्वारे मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून ते धारावीतील सांडपाणी प्रकिया केंद्रापर्यंत बोगद्याद्वारे वळवण्याचे काम होणार आहे. २०२५ पर्यंत त्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

मिठी व वाकोला नदीचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे, फ्लड गेट बांधणे, उदंचन पंप बांधणे, प्रामनेड बांधणे इत्यादी कामेही होणार आहेत. आता सर्व कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply