पुण्यात ४० लाखांपैकी १२ लाख दुचाकींचाच विमा

पुणे - दुचाकींचे (Two Wheeler) शहर म्हणून देशभर लौकिक असलेल्या पुण्यातील (Pune) सुमारे ४० लाखांपैकी अवघ्या १२ लाख दुचाकींचा विमा (Insurance) उतरविला गेला आहे. तर तब्बल २८ लाख दुचाकी विम्याशिवाय शहरात धावत आहेत. परिणामी, अपघात घडल्यावर वाहनचालकांसह अपघातग्रस्त व्यक्तीला आर्थिक मदत मिळणे अवघड झाले आहे.

पुणे आरटीओ कार्यालयाकडे सुमारे ४० लाख दुचाकीची नोंद आहे. मोटार वाहन कायद्यानुसार प्रत्येक वाहनाला विमा बंधनकारक आहे. नवीन दुचाकी घेताना दोन वर्षांचा विमा सक्तीचा आहे. चालकाने दरवर्षी विम्याचे नूतनीकरण करणे अपेक्षित आहे. मात्र उदासीनतेमुळे अनेक दुचाकीस्वार विमा न काढताच दुचाकी सुसाट चालवितात. ज्यावेळी आरटीओ अथवा वाहतूक पोलिस कारवाई करतात, त्यावेळी विम्याची आठवण येते. अशावेळी विमा नसल्याने दोन ते चार हजार रुपयांचा दंड होतो. दंडाच्या तुलनेत विम्यासाठीचा खर्च कमी आहे. मात्र, तरीही बहुतांश पुणेकर विमा काढण्याकडे दुर्लक्ष करतात.

मोटार वाहन कायद्यात विमा असणे बंधनकारक आहे. कलम १४६ व १९२ नुसार विना विमा वाहन चालविताना आढळल्यास दोन ते चार हजार रुपयांचा आर्थिक दंड होतो. यात वाहनचालक व मालक जर एकच व्यक्ती असेल तर त्यास दोन हजार रुपयांचा दंड होतो. तर वाहन चालक व मालक वेगळे असतील तर मात्र दंडाची रक्कम ही चार हजार इतकी आहे.

वाहनांवर दोन प्रकारचा विमा काढला जातो. यात थर्ड पार्टी व पूर्ण विम्याचा समावेश आहे. वाहनांच्या सीसीवर विम्याची रक्कम ठरते. सामान्यपणे १०० सीसीच्या दुचाकीसाठी थर्ड पार्टीची रक्कम १००० ते ११०० इतकी आहे. तर पूर्ण विम्याची रक्कम १६०० ते २००० इतकी आहे. जर थर्ड पार्टी विमा असेल तर समोरच्या व्यक्तीला व त्याच्या वाहनाला नुकसान भरपाई मिळते. पूर्ण विम्यामध्ये सर्वच घटकांचा समावेश होतो. त्यामुळे वाहनांचे अथवा व्यक्तीचे शारीरिक नुकसान झाल्यावर आर्थिक मदत मिळणे सोपे होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply