पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ऑनलाइन मिळकतींचा शोध घेण्याची सुविधा पूर्ववत

पुणे : मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार करताना खरेदीदाराकडून संबंधित मालमत्ता खरेदी करण्यायोग्य आहे किंवा कसे, संबंधित मालमत्तेबाबत काही कायदेशीर वाद तर नाहीत ना? याकरिता शोध अहवाल काढला जातो. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन मिळकतींचा शोध (ई-सर्च रिपोर्ट) या सुविधेत तांत्रिक बिघाड निर्माण झाला होता. हा बिघाड दूर करण्यात आला असून ही सुविधा पूर्ववत करण्यात आली आहे.

खरेदी-विक्री व्यवहारात मध्यस्त व्यक्तीकडून, त्रयस्थ व्यक्तींकडून फसवणूक होऊ नये, खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत आणि पारदर्शकपणे होण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने बहुतांश सेवा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यानुसार मिळकतीचा इतिहास तपासण्यासाठी विभागाने ऑनलाइन मिळकत शोध सुविधा देखील सुरू केली आहे. यामध्ये सन २००२ नंतरच्या सर्व मिळकतींच्या व्यवहारांची माहिती प्राप्त करता येते, तर मुंबई आणि उपनगरांमध्ये सन १९८५ पासूनचे दस्त एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मिळकतीच्या नकाशापासून त्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या परवानग्या आहेत किंवा कसे, अकृषक परवाना काढला आहे किंवा कसे, अधिकृत बांधकाम परवानगी घेतली आहे का, मिळकतीचा प्रथम मालक कोण, खरेदी व्यवहार, मिळकतीवर असणारा बोजा, त्या मिळकतीचे झालेले खरेदी-विक्री व्यवहार, मिळकतीतील भागीदार आदींची माहिती या मिळकत शोध सुविधेतून प्राप्त करता येते. गेल्या काही दिवसांपासून या सुविधेत काही तांत्रिक अडचणी येत होत्या. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या पातळीवर हा बिघाड दुरुस्त करून ऑनलाइन मिळकत शोध सुविधा पूवर्वत करण्यात आली आहे.

दरम्यान, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ऑनलाइन प्रणालीमध्ये (मेटा डेटा) जुन्या मिळकतींची माहिती संकलित असून ती माहिती वेगळी करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे काही प्रमाणात समस्या येत होती. याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) स्तरावर काम करून माहिती तंत्रज्ञान विभागातील पाच तज्ज्ञांचे पथक देखील मुख्यालयात दाखल झाले होते. परिणामी सध्या या सुविधेतील तांत्रिक बिघाड दुरुस्त करून ही ऑनलाइन ई-मिळकत शोध सुविधा सुरळीत करण्यात आली असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.

मिळकतींचा ऑनलाइन शोध घेण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यात आल्या असून ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. राज्यात सन २००२ नंतरच्या सर्व मिळकतींच्या व्यवहारांची माहिती ऑनलाइन मिळेल, तर मुंबई आणि उपनगरांमध्ये सन १९८५ पासूनचे दस्त एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, जे दस्त काही कारणांनी स्कॅन झालेले नाहीत, ते ऑनलाइन दिसणार नाहीत, याची सर्वांनी नोंद घेण्याची गरज आहे. – श्रावण हर्डीकर, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply