नाशिक : कांद्याच्या निर्यातीला कंटेनरची चणचण

नाशिक : लाल कांदा संपण्याच्या टप्प्यात असताना उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाल्याने स्थानिक बाजारपेठेत भाव घसरणीला लागले आहेत. सोमवारी (ता. २८) दिवसभरात सरासरी ७१० रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली. तसेच पाकिस्तानचा कांदा उपलब्ध नसल्याने आखाती देशांसह श्रीलंका, सिंगापूर, मलेशियामधून कांद्याची मागणी वाढली असली, तरीही कांद्याच्या निर्यातीसाठी कंटेनरची चणचण भासत आहे.

आर्थिक वर्षाखेरीमुळे निर्यातीला वेग आला असल्याने कांद्यासाठी कंटेनर मिळणे मुश्‍कील झाले आहे. श्रीलंका, सिंगापूर, मलेशियासाठी ३० टनाच्या कंटेनरला एक हजार ९०० च्या जागी अडीच हजार डॉलर भाडे देऊनही कंटेनर मिळत नसल्याची निर्यातदारांची व्यथा आहे. दुबईसाठी कंटेनरचे भाडे दोन हजार डॉलरवरून तीन हजार डॉलरपर्यंत पोचले आहे. मार्चएंडला बंदरात ट्रॅफिक जामच्या समस्येला निर्यातदारांना गेल्या वर्षीपर्यंत सामोरे जावे लागत होते. पण, यंदा ही स्थिती अद्याप उद्‌भवली नसल्याचे निर्यातदारांनी सांगितले. सद्यःस्थितीत कंटेनरचे भाडे वाढल्याने एका कंटेनरभर कांद्याच्या भावात ५० ते ७० हजार रुपयांची वाढ होत असली, तरीही आखाती देशातून भारतीय कांद्याला चांगली मागणी आहे. पाकिस्तानचा नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी दीड महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, दुबईसह आखाती देशांना भारतीय कांद्याशिवाय पर्याय नसेल. अशातच, पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरतेचे ढग कायम राहिल्यास कांद्याच्या उपलब्धतेचे प्रश्‍न तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंधरा दिवस लाल कांदा विक्रीस येईल

लाल कांदा आणखी पंधरा दिवस विक्रीसाठी येऊ शकेल, अशी स्थिती आहे. त्यातच, लाल कांद्याच्या गुणवत्तेचा प्रश्‍न तयार झाला असल्याने भाव कमी मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. उन्हाळ कांद्याची साठवणूक अधिक काळ होत असल्याने बहुतांश शेतकरी सध्याच्या कोसळलेल्या भावात कांद्याची विक्री कितपत करतील? हा प्रश्‍न कायम आहे. तसे घडल्यास लाल कांदा संपल्यावर भाव स्थिरावण्यास हातभार लागणार आहे. पण तरीही केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीकडे लक्ष दिल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकेल, असे मानले जात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply