Nagpur : रेशनच्या तांदळात प्लास्टिकची अफवा; लाभार्थ्यांमध्ये संभ्रम फोर्टिफाइड तांदळासंदर्भात जनजागृतीची गरज

Nagpur :  शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांतर्गत मिळणाऱ्या रेशनच्या तांदळात फोर्टिफाइड तांदळाचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, ग्रामीण भागात या तांदळात प्लास्टिक असल्याची अफवा पसरल्याने लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अन्न व पुरवठा विभागांकडून विभागाकडून याबाबत जनजागृती करण्याची मागणी होत आहे.

रामटेक तालुक्यातील अन्न व पुरवठा विभागाकडून अंत्योदय अन्न योजना तथा प्राधान्यक्रम कुटुंब शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ वितरित करण्यात येते. वितरित करण्यात आलेल्या तांदळात प्लॉस्टिक तांदूळ असल्याची सर्वत्र चर्चा आहे. हलका, पिवळा आणि दाण्याची चव वेगळी असल्याने तसेच हा तांदूळ खाल्ल्याने पोटात दुखते अशा अफवेला तालुक्यात पेव फुटले आहे.

Kolhapur : 'भारत का बादशाह टिपू सुलतान'; आक्षेपार्ह मजकुरावरून कसबा बावड्यात पुन्हा तणाव, हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तथा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत पिवळ्या व केशरी शिधा पत्रिकाधारकांना अन्न पुरवठा विभागाकडून मोफत तांदूळ वितरित करण्यात येतो. यात प्लॉस्टिक तांदूळ वितरित करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हलका असल्याने पाण्यात तरंगत असल्याने तो प्लास्टिकचाच तांदूळ असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. पण अन्नपुरवठा व वितरण विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानातून पुरविण्यात येत असलेला हा तांदूळ पोषण तत्व गुणवर्धित (फोर्टिफाइड ) असल्याचे विभागाद्वारे सांगण्यात येत असते तरी नागरिकांमधील तांदळाविषयी असलेला संभ्रम दूर करण्यासाठी पुरवठा विभागाकडून प्रभावी असे प्रयत्न होताना दिसत नाही.

सेवनाविषयी संभ्रम

केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा आणि मानकाप्रमाणे फोर्टिफाईड असलेल्या खाद्य पदार्थातील लोहाचे सेवन थॅलेसेमिया ग्रस्त व्यक्तींनी वैद्यकीय मार्गदर्शनाखाली तर सिकलसेल, ॲनिमियाग्रस्त रुग्णांनी पूर्णतः टाळावे, अशा सूचना स्वस्त धान्य दुकान येथे लावल्याने या तांदळाच्या सेवनाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

 

असे आहेत तांदूळ

रेशनिंगच्या एक किलो तांदळात दहा ग्रॅम फोर्टिफाइड असतात. तांदळाची पावडर करून त्यात पोषणमूल्ये टाकून हे तांदूळ बनतात. रंगाने पिवळसर व वजनाने हलके असल्याने ते पाण्यावर तरंगतात. शिजवताना आपण कायम शिजवतो तसाच हा शिजवावा लागतो. फोर्टिफाइड तांदूळ ओळखायला सोपा असल्याने काळाबाजार करणाऱ्यांना सहज पकडता येते. त्यामुळे काळा बाजार रोखला जाईल असे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

अन्न व पुरवठा विभागाने कधी सांगितलेच नाही

अन्न व पुरवठा विभागाकडून देशातील नागरिकांमधील सुक्ष्म पोषक तत्वाच्या पूर्ततेसाठी व्हिटॅमिन ए, बी, बी १२, फॉलिक ॲसिड, लोह, जस्त इत्यादी मिश्रित पोषण तत्व गुणवर्धित फोर्टिफाइड तांदळाचे वितरण शिधा पत्रिका धारकांना रेशन दुकानातून करण्याचा शासनाने निर्णय घेतला गेला.

 

जिल्ह्यात फोर्टिफाईड तांदूळ वाटपास जुलै महिन्यापासून सुरुवात करण्यात आली. मात्र सर्वसामान्य नागरिकांना अशा प्रकारचा तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून मिळणार असल्याची व्यापक जनजागृती विभागाद्वारे करण्यात आली नाही. या कारणाने शिधा पत्रिकेवर मिळणारे तांदळात प्लॉस्टिक असल्याची शंका लाभार्थी उत्पन्न करीत आहे. याबाबत कधीच सांगितले नसल्याचे लाभार्थी सांगतात.

 

हा तांदुळ थॅलेसेमिया, सिकलसेल ॲनिमिया ग्रस्त रुग्णांकरिता संवेदनशील आहे. पोषक घटकांचा समावेश करून फोर्टिफाईड तांदूळ बनविण्यात आला आहे. अधिकची पोषकतत्वे मिळण्याच्या दृष्टीने हा तांदूळ अत्यंत उपयुक्त आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील हा तांदूळ सूक्ष्म पोषणमूल्ये टाकून तयार केला आहे. त्यामुळे पाण्यात टाकल्यास काही तांदूळ तरंगले तर गैरसमज करू किंवा पसरवू नये. सदर तांदूळ पोषणमूल्ययुक्त आहे. त्याचा आहारात समावेश आवश्यक आहे

हंसा मोहने

तहसीलदार, रामटेक

 

अशी आहेत पोषणमूल्ये

लोह (आयर्न) - अशक्तपणा दूर करते, लाल पेशींची कमतरता भरून काढते.

फॉलिक ॲसिड - गर्भाचा विकास व नवीन रक्तपेशी तयार करते.

व्हिटॅमिन बी १ - मज्जासंस्था व मेंदूची कार्यक्षमता वाढते.

झिंक, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १ व्हिटॅमिन बी २, व्हिटॅमिन बी ५, व्हिटॅमिन बी ६ हे शारीरिक मानसिक क्षमता वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply