Mahavitaran Strike : मध्यरात्रीपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा संप; संपकाळातही मिळणार अखंडित वीजपुरवठा

Mahavitaran Strike: काल (३ जानेवारी) मध्यरात्रीपासून महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. अदानी समुहाच्या मागणीमुळे हा संप पुकारण्यात आल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. खाजगीकरणाला विरोध करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या ३० संघटनांनी संप केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा संप सुरू असून पुढचे तीन दिवस संप कायम राहणार आहे. 

दरम्यान यासंपावर राज्य सरकारने सर्व संघटनांना कारवाईच्या नोटीस बजावल्या आहेत. मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाईल असे यात म्हटले आहे. यावर महावितरणाच्या एका कर्मचाऱ्याने म्हटले आहे की, आम्ही नियमानुसार संप केला आहे. १५ दिवस आधी आम्ही या संदर्भात नोटीस दिली होती. त्यामुळे हा संप मागे घेतला जाणार नाही.

महावितरण कंपनीने संप पुकारल्यावर नागरिकांना चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका असे सांगितले आहे. तसेच पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर काम करतील, कोणतीही शंका अथवा समस्या असल्यास महावितरणाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधत या कार्यासाठी सहकार्य करावे, असे म्हटले आहे.

संप पुकारल्यापासून अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. अशात वीजपुरवठ्याच्या परिस्थितीवर लक्ष देण्यासाठी मुंबईयेथील मुख्य कार्यालय आणि सर्व परिमंडळ कार्यालयाच्या ठिकाणी संनियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये २४ तास सेवा पुरवली जाणार आहे. कंपनीने ठरवलेले कर्मचारी या काळात कामावर हजर नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे. यासाठी एजन्सी कामगार, कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त अभियंता यांची नेमणूक करण्यात आली आहे. जर कोणत्याही ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला असेल तर २१२-३४३५/१८००-२३३-३४३५/१९१२/१९१२० या क्रमांकावर संपर्क साधावा असे महावितरण कंपनीने सांगितले आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply