Maharashtra Politics : .. तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

 Mumbai News: विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात २६ नोव्हेंबरपूर्वी नवे सरकार स्थापन होणेआवश्यक आहे; परंतु कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवटीची वेळ येऊ शकते. बहुतेक एक्झिट पोल्सने महायुतीला बहुमत दिले असले, तरी त्यांना किंवा मविआला निर्णायक आघाडी न मिळाल्यास राज्यपाल सत्तास्थापनेसाठी कुणाला आमंत्रित करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. अशा स्थितीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला सरकार स्थापनेचा दावा करता येतो.

विधानसभेच्या निकालानंतर सरकार स्थापनेची प्रक्रिया महत्त्वाची राहणार आहे. २६ तारखेला विद्यमान विधानसभेचा कालावधी संपणार आहे. निकाल लागल्यानंतर केवळ दोन दिवसांत नवे सरकार स्थापन करण्याची तयारी राजभवनाला करावी लागणार आहे.
कोणत्याही आघाडी वा युतीला निर्णायक बहुमत न मिळाल्यास कायदेतज्ज्ञांच्या मते सर्वाधिक जागा मिळालेल्या राजकीय पक्षाला सरकार स्थापनेचे पहिले निमंत्रण द्यावे लागेल. हा पक्ष कोणता असेल, त्यावर आगामी राजकारणाची वाटचाल ठरू शकेल, असेही सांगितले जात आहे. पुन्हा एकदा सत्तांतराचा प्रयोग महाराष्ट्रात होतो, की सरकारस्थापनेची प्रक्रिया ठप्प पडते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या दोघांनीही आज सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राजकीय पक्षांच्या पुढील हालचाली कशा असतील, त्याबद्दल येत्या दोन दिवसांत परिस्थिती स्पष्ट होईल. विद्यमान व्यवस्थेत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीही निवडणूकपूर्व आघाड्या असल्यामुळे यातील कोणत्याही बाजूला निर्णायक बहुमत मिळाल्यास परिस्थिती सोपी होईल.

बहुमताचा १४५चा आकडा कोणालाही गाठता न आल्यास मात्र कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. निवडून आलेल्या नव्या सदस्यांचे अधिवेशन राज्यपाल बोलावतात; मात्र यासंबंधीचा निर्णय राज्यपाल मंत्रिमंडळाच्या शिफारशीनंतर घेतात. त्यासाठी मंत्रिमंडळ अस्तित्वात येणे आवश्यक असल्याने म्हणजेच मुख्यमंत्री कोण हे ठरवणे आवश्यक असल्याचे कायदेतज्ज्ञ सांगतात. प्रत्यक्षात दोन दिवसांत मुख्यमंत्री ठरू शकला नाही तर विधानसभेचा कालावधी संपला, हे लक्षात घेत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची परिस्थिती येऊ शकते. विधानसभेचा निकाल कसा लागतो, याकडे राजभवन लक्ष ठेवून आहे.

निकालानंतर चित्र स्पष्ट होईल

याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, निवडून आलेल्या सरकार पक्षाला सत्ता स्थापनेचे निमंत्रण राज्यपाल देतात किंवा राज्यपालांकडे जाऊन बहुमत मिळवलेला पक्ष सरकार स्थापनेचा दावा करतो.

निकालानंतर आकडेवारी समोर आल्यावर कोण मुख्यमंत्री होईल किंवा युती की आघाडी जिंकेल ते स्पष्ट होईल. राज्यपाल यासंदर्भात निर्णय घेऊ शकतील. एखादी आघाडी किंवा युती नव्याने तयार होत असेल तर त्यासाठी घटनेतील शेड्युल दहानुसार निर्णय घ्यावे लागतात. गेल्या काही वर्षात काही राज्यांमध्ये कोणत्या नेत्याने मुख्यमंत्री होण्याचा दावा करायचा, याबद्दल निर्णय न झाल्याने कमी जागा जिंकलेल्या पक्षाचाही मुख्यमंत्री झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply