Maharashtra ISIS Module Case : NIA ची पुण्यात मोठी कारवाई ! महाराष्ट्र इसिस मॉड्युलप्रकरणी कोंढव्यातील डॉक्टरला अटक

पुणे - देशात विघातक कारवाया करण्याचा कट आखणाऱ्या इसिसच्या महाराष्ट्र मॉड्युल प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पुण्यातील कोंढव्यातून एका डॉक्टरला अटक केली. तो इसिस या दहशतवादी संघटनेत तरुणांची भरती करीत असल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे.

एनआयएच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. २७) पहाटे कोंढवा परिसरात छापे टाकून डॉ. अदनान अली सरकार (वय ४३) याला अटक केली. एनआयएने डॉ. अदनान अली याच्या कोंढव्यातील घराच्या झडती घेतली.

या कारवाईत इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि इसिसशी संबंधित दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. अदनान अली हा काही तरुणांचे ‘ब्रेन वॉश’ करून इसिस संघटनेत भरती करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

आरोपींनी इस्लामिक स्टेट (आयएस), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (आयएसआयएल), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (इसिस) आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि खोरासान अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या इसिस संघटनेच्या माध्यमातून दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला होता.

देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौमत्व बिघडविण्याचा इसिसचा कट होता, असे एनआयएच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या कटाचा संपूर्ण उलगडा करण्यासाठी तपास करण्यात येत असल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली.

Pune News : पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात शिकणाऱ्या नाशिकच्या तरुणाची आत्महत्या; घटनेने खळबळ

महाराष्ट्र इसिस मॉड्युलप्रकरणी पाचवी अटक -

महाराष्ट्र इसिस मॉड्युल प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. एनआयएने या कटाबाबत २८ जून २०२३ रोजी गुन्हा दाखल केला होता. मुंबई, ठाणे आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर छापेमारी करून तीन जुलै रोजी एनआयएने यापूर्वी इतर चार जणांना अटक केली होती.

मुंबईतील नागपाडा येथून तबिश नासेर सिद्दीकी, पुण्यातील कोंढव्यातून जुबेर नूर महम्मद शेख ऊर्फ अबू नुसैबा, ठाण्यातील शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी त्यांची नावे आहेत.

भूलतज्ज्ञ डॉ. अदनान अली

डॉ. अदनान अली सरकार हा भूलतज्ज्ञ असून, सुमारे १५ वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत आहे. त्याने पुण्यातील प्रसिध्द वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस आणि एमडी पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तो शहरातील एका खासगी महाविद्यालयात आणि रुग्णालयात सल्लागार म्हणून काम करीत होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply