INS Vikrant ची शेवटची चाचणी यशस्वी, महिनाअखेरीस नौदलाकडे सूपुर्त केली जाणार, १५ ऑगस्टला नौदलाच्या सेवेत दाखल होणार

नौदलाच्या सामर्थ्यात मोलाची भर घालणारी आयएनएस विक्रांत ही स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौका आता नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज झाली आहे. काल म्हणजे रविवारी १० जूलैला आयएनएस विक्रांतची चौथी आणि अखेरची चाचणी यशस्वीरित्या पार पडली. भर समुद्रात विविध उपकरणांच्या चाचण्या झाल्यावर विक्रांत काल कोच्ची बंदरातल्या कोच्ची शिपयार्डच्या तळावर परतली.

जुलै महिन्याच्या अखेरीस विक्रांत ही नौदलाकडे सूपुर्त केली जाईल. येत्या १५ ऑगस्टला आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेते दाखल करत ‘आझादी का अमृतमहोत्सव ‘ (Azadi Ka Amrit Mahotsav) कार्यक्रम साजरा केला जाणार आहे.

नौदलात नाव व्यपगत होत नाही

नौदलात एखादी युद्धनौका-पाणबुडी ही सेवेतून निवृत्त झाली की तेच नाव कालांतराने त्याच प्रकारच्या श्रेणीतील युद्धनौकांना द्यायची प्रथा आहे. म्हणजेच नौदलात युद्धनौकेला दिलेले नाव हे कधीही पुसले जात नाही, नष्ट होत नाही, व्यपगत होत नाही. नव्या युद्धनौकेच्या निमित्ताने विक्रांत हे नाव कायम रहाणार आहे. ब्रिटीशांनी वापरलेल्या विमानवाहू युद्धनौकेची डागडुजी करत भारतीय नौदलाने पहिली विमानवाहू युद्धनौका १९६१ च्या सुमारास सेवेत दाखल करुन घेतली. तिचे नामकरण आयएनएस विक्रांत असे करण्यात आले. ही विक्रांत १९९७ ला सेवेतून निवृत्त झाली. आता हेच नाव स्वदेशी बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेला देण्यात आले आहे.

नव्या विक्रांतचा प्रवास

नवी आयएनएस विक्रांतची बांधणी ही स्वबळावर, स्वबळावर आरेखन करत, स्वदेशी तंत्रज्ञान वापरत करण्यात आली आहे. देशाचा विस्तृत समुद्रकिनारा, बदलती सामरिक परिस्थिती लक्षात घेता १९९० च्या दशकात नव्या आणि स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेची आवश्यकता भासू लागली. त्यानुसार विक्रांतचा आराखडा निश्चित करत कोच्ची शिपयार्डमध्ये फेब्रुवारी २००९ ला विक्रांतच्या बांधणीला सुरुवात झाली. ऑगस्ट २०१३ मध्ये युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. त्यानंतर विविध उपकरणे युद्धनौकेवर बसवण्यात आली. करोना काळामुळे विक्रांतच्या चाचण्यांना जरा उशीर झाला. असं असलं तरी ऑगस्ट २०२१ ला पहिली, ऑक्टोबर २०२१ला दुसरी, जानेवारी २०२२ ला तिसरी आणि त्यानंतर जूलैच्या पहिल्या आठवड्यात विक्रांतची चौथी चाचणी यशस्वी झाली. या सर्व चाचण्यांमध्ये युद्धनौकेचे मुख्य इंजिन, रडार, संदेशवहन यंत्रणा, विविध अन्य उपकरणे यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. तसंच लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर हाताळण्याची युद्धनौकेची क्षमता तपासण्यात आली. आता या सर्व चाचण्या यशस्वी पूर्ण झाल्या असल्याने विक्रांत लवकरच नौदलात दखल होणार आहे.

आयएनएस विक्रांतचे सामर्थ्य

विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आहे, म्हणजे एकप्रकारे तरंगता विमानतळ हा विक्रांतवर आहे. एकाच वेळी ३० पेक्षा जास्त विविध प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर हाताळण्याची विक्रांतची क्षमता आहे. विक्रांतचे वजन हे तब्बल ४० हजार टन एवढे असून पुर्ण क्षमतेने कार्यरत असतांना हे वजन ४५ हजार टन एवढे असते. एका दमात १५ हजार किलोमीटर एवढा पल्ला गाठण्याची विक्रांतची क्षमता आहे. तब्बल १४०० पेक्षा जास्त नौसैनिक अधिकारी-कर्मचारी हे विक्रांतवर तैनात असतात. हवेतील १०० किलोमीटर पर्यंतचे विविध उंचीवरील लक्ष्य भेदणारी बराक-८ ही क्षेपणास्त्रे विक्रांतवर तैनात असणार आहे. तब्बल २६२ मीटर लांब आणि १४ मजली उंच अशी या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेमुळे नौदलाच्या प्रहार क्षमतेत मोलाची भर पडणार आहे.

विमानवाहू युद्धनौका बांधण्याचे तंत्रज्ञान हे अत्यंत आव्हानात्मक समजले जाते.विक्रांतची बांधणी हे ६६ टक्क्यांपेक्षा जास्त स्वदेशी आहे. विमनानवाहू युद्धनौक बांधणे हे जगात आत्तापर्यंत फक्त मोजक्या देशांना शक्य झाले आहे. आता यामध्ये भारताचीही भर पडली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply