INS Vagir : वागीर पाणबुडी एमडीएलकडून नौदलाच्या ताब्यात; स्कॉर्पिओ वर्गातील पाचवी पाणबुडी

मुंबई : प्रोजेक्ट ७५ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील फ्रेंच बनावटीच्या पाचव्या वागीर या पाणबुडीचा ताबा माझगाव डॉक लि. कडून आज नौदलाकडे सोपवण्यात आला. आता ही पाणबुडी यथावकाश नौदल ताफ्यात समाविष्ट करून घेतली जाईल. या पाणबुडीचा ताबा देण्याच्या व स्वीकारण्याच्या कागदपत्रांवर माझगाव डॉक लि. च्या व नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यापूर्वी या प्रकारातील कलवरी, खांदेरी, करंजा आणि वेला या पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात आहेत. तर सहाव्या वागशीर या पाणबुडीचे जलावतरण यावर्षी एप्रिलमध्ये झाले असून ती आता कठोर समुद्री चाचण्यांसाठी सज्ज झाली आहे.

आज नौदलाच्या ताब्यात दिलेल्या वागीर या पाणबुडीचे दोन वर्षांपूर्वी जलावतरण झाले होते. या कालावधीत तिच्या कठोर समुद्री चाचण्या झाल्या. युद्ध तसेच अन्य सर्व परिस्थितीत समर्थपणे काम करण्यास ती सज्ज असल्याचे सिद्ध झाल्यावर आज तिचा ताबा नौदलाला देण्यात आला. या पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे ती स्टेल्थ म्हणजे शत्रूच्या पाणबुडीशोधक सोनार यंत्रणेला चकवणारी आहे. कमीत कमी आवाज करणे, केलेला आवाज शोषून घेणे तसेच एरोडायनामिक सारख्या हायड्रोडायनामिक आकारामुळे पाण्याला कमीत कमी प्रतिरोध व त्याचा कमीत कमी आवाज करणे या वैशिष्ट्यांमुळे या पाणबुडीचा सुगावा शत्रूला सहज लागत नाही.

या पाणबुडीवर असलेले पाणबुडीविरोधी टॉर्पेडो आणि शत्रूच्या युद्धनौकांवर डागण्यात येणारी क्षेपणास्त्रे पाण्याखालून तसेच पाण्याच्या वरूनही डागता येतात. या प्रकारच्या पाणबुड्या शत्रूच्या पाणबुड्यांवर तसेच युद्धनौकांवर हल्ला चढवू शकतात. त्याचप्रमाणे परिसराची टेहळणी करणे व माहिती मिळवणे, पाणसुरुंग पेरणे आदी कामेही या पाणबुड्या करू शकतात. सर्वात आधी रशियाने बनवलेल्या सिंधुघोष वर्गातील पाणबुड्या भारत वापरत होता. त्यानंतर जर्मन बनावटीच्या शिशूमार वर्गाच्या पाणबुड्या भारतात तयार झाल्या. आता फ्रेंच बनावटीच्या स्कॉर्पिओ पाणबुड्या माझगाव डॉकमध्ये तयार होत आहेत. भारताने नुकतीच मध्यम आकाराची अरिहंत ही अणुपाणबुडी निर्मित केली असून आता माझगाव डॉक, मध्यम आकाराच्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या पाणबुडीचे डिझाईन आणि बांधकाम करीत आहे. त्याद्वारे स्वदेशी पाणबुडी निर्मिती कार्यक्रमाचा पाया घातला जाईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply