ERASR Test : खोलवर असलेल्या पाणबुड्यांना भेदणाऱ्या ‘अँटी सबमरीन’ची चाचणी यशस्वी

पुणे - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारतीय नौदलाच्या वतीने ‘पाणबुडी बेदी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रा’ची (एक्स्टेंडेड रेंज अँटी सबमरीन रॉकेट-‘ईआरएएसआर) नुकतीच यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ही चाचणी नौदलाच्या आयएनएस चेन्नई या विनाशिकेवरून (डिस्ट्रॉयर) करण्यात आली. या यशस्वी चाचणीनंतर एक महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला असून सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने भारतीय नौदलाची ताकद वाढणार आहे.

डीआरडीओच्या वतीने पाण्यात १० ते ३५० मीटर खोलवर असलेल्या पाणबुड्यांना भेदण्याकरिता या ‘अँटी सबमरीन’ची (पाणतीर) रचना व विकास करण्यात आले. विशेष म्हणजेच ईआरएएसआरच्या रॉकेट प्रणालीचा विकासात पुण्याचा मोठा योगदान आहे. डीआरडीओच्या पुण्यातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास संस्था (एआरडीई) आणि उच्च ऊर्जा सामग्री संशोधन प्रयोगशाळेच्या (एचईएमआरएल) वतीने या प्रणालीचा विकास करण्यात येत आहे.

या प्रणालीची २.७ किलोमीटरपर्यंत लहान पल्ल्याचे तर, लांबच्या पल्ल्यात ८.५ किलोमीटर पर्यंत लक्ष्य भेदणारी क्षमतेची चाचणी यावेळी करण्यात आली. तसेच ऑनबॉर्ड रडार आणि टेलीमेट्री प्रणालीद्वारे लक्ष्याच्या अचूक भेद करण्यासाठी ‘ईआरएएसआर’च्या आवश्‍यक मार्गाचे निरिक्षण करण्यात आले. दरम्यान पाण्याखाली झालेले स्फोट सुनिश्‍चित करण्यासाठी सोनार प्रणालीचा वापर करण्यात आला. शत्रूच्या पाणबुड्यांना डागण्यासाठी नौदलाच्या विविध जहाजांवर बसविण्यात आलेल्या ‘स्वदेशी रॉकेट लॉंचर’वरून (आयआरएल) याचा वापर केला जाईल. सामरिक मोहिमेच्या आवश्यकतेनुसार ईआरएएसआरला एकल किंवा ‘सॅल्व्हो मोड’मध्ये डागले जाऊ शकतात. या यशामुळे नौदलाची पाणबुडीविरोधी युद्धाची क्षमता वाढेल तसेच, संरक्षण क्षेत्रात ते आत्मनिर्भर होईल, असा विश्‍वास डीआरडीओ व नौदलाद्वारे व्यक्त करण्यात येत आहे.

ईआरएएसआर बाबत -

भारतीय नौदलाच्‍या जहाजांवर बसविण्यात आलेल्या आणि वापरात असलेल्या ‘आरजीबी’ क्षेपणास्त्रांच्या जागी स्वदेशी बनावटीच्या ‘ईआरएएसआर’चा वापर केला जाणार आहे. आरजीबी क्षेपणास्त्र हे रशियाकडून आयात करण्यात आले होते. आत्मनिर्भर भारत या संकल्पनेंतर्गत डीआरडीओच्या विविध प्रयोगशाळांमार्फत स्वदेशी शस्त्रास्त्रे, प्रणाली, यंत्रणे आदींची निर्मिती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईआरएएसआरची निर्मिती करण्यात आली आहे. ‘आरजीबी’ची मारा करण्याची क्षमता ही ५ किलोमीटरपर्यंतची असून त्या तुलनेत ईआरएएसआर हे ८ किलोमीटरपर्यंत लक्ष्य भेदू शकते. नौदलासाठी ही अत्यंत महत्त्वाची व आवश्यक प्रणाली आहे. त्याअनुषंगाने एआरडीईने प्रत्यक्ष जहाजावरून यशस्वीपणे चाचण्या घेतल्या आहेत. सध्या या प्रकल्पावर ‘मिशन मोडवर’ काम केले जात असून जून २०२४ पर्यंत सर्व प्रकारच्या चाचण्या पार पाडत याचे काम पूर्ण होईल. दरम्यान ईआरएएसआरच्या उत्पादनासाठी भागीदार म्हणून भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनी काम करेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply