Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: “आम्ही फक्त सहा फुटांच्या पुतळ्याला परवानगी दिली होती, पण…”, कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रांचे मोठे विधान

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : सिंधुदुर्गातील मालवण समुद्रकिनारी राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५ फुटांच्या (चबुतऱ्यासह) पुतळ्याचे लोकर्पण करण्यात आले होते. मात्र हा पुतळा कोसळल्यामुळे आता राज्यातील राजकारण पेटले असून या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर विरोधकांनी या घटनेचे राजकारण केले असल्याचा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी मांडला आहे. मात्र राज्याच्या कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी या संदर्भात तांत्रिक माहिती देऊन केवळ सहा फुटांच्या पुतळ्यासाठी परवानगी दिल्याचा दावा केला आहे.

काय म्हणाले राजीव मिश्रा?

कला संचलनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, राज्यात कुठेही महापुरूषांचा पुतळा उभारायचा असल्यास कला संचलनालयाची परवानगी घ्यावी लागते. अन्यथा त्यांना पुतळा उभारता येत नाही. आमच्याकडे जेव्हा एखादी एजन्सी पुतळा उभारण्याची परवानगी मागते, तेव्हा त्याबरोबर त्यांना पुतळ्याचे क्ले मॉडेल सादर करावे लागते. या प्रकरणात शिल्पकाराने सहा फुटांचा क्ले मॉडेल सादर केला होता. यानंतर कला संचलनालयाची समिती ज्यामध्ये तज्ज्ञ, कला इतिहासकर आणि कलाकार यांचा समावेश असतो, ही समिती पुतळ्याच्या क्ले मॉडेलची तपासणी करून परवानगी देत असते. यात महापुरूषाच हावभाव, त्यांची शारीरिक रचना यावर बारकाईने कटाक्ष टाकला जातो. यानंतर क्ले मॉडेलला परवानगी दिली जाते. क्ले मॉडेलला परवानगी मिळताच संबंधित शिल्पकार त्याला पुढे कशाप्रकारे नेतो, ही त्याची जबाबदारी असते.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse

“मालवणच्या घटनेमध्ये असे झाले की, आम्ही केवळ सहा फुटांच्या क्ले मॉडेलला मान्यता दिल्यानंतर तसे नौदललाही कळविण्यात आले. मात्र त्यानंतर हा पुतळा ३५ फुटांचा केला जाणार आहे, याबाबत आम्हाला माहिती देण्यात आली नव्हती. तसेच पुतळ्याच्या स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टिलचा वापर होणार आहे, याचीही आम्हाला कल्पना नव्हती. तसेच पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुविशारदाकडून घ्यावी लागते. दोन्ही परवानगी मिळाल्यानंतर शिल्पकाराला तसे पत्र दिले जाते. त्यानंतर शिल्पकाराची जबाबदारी असते”, असेही राजीव मिश्रा यांनी सांगितले.

मग जबाबदार कोण?

कला संचलनालयाने जर सहा फुटांच्या पुतळ्याची परवानगी दिली होती, मग हा पुतळा ३५ फुटांचा कसा झाला? याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला असता राजीव मिश्रा म्हणाले की, ज्या एजन्सीकडून पुतळा उभारला गेला त्यांनी जर शिल्पकाराला पुतळ्याची उंची वाढविण्यास सांगितली असेल तर शिल्पकाराने त्यासंबंधी अभ्यास करायला हवा होता. एवढ्या उंचीचा पुतळा उभारण्यासाठी स्ट्रक्चरल इंजिनिअरची मदत घ्यावी लागेल, तसेच तिथल्या परिसरात पुतळा उभारताना कोणती काळजी घ्यायला हवी, पुतळा उभा करताना कोणती तांत्रिक काळजी घ्यावी, याचा अभ्यास न केल्यामुळे कदाचित ही दुर्घटना घडली असावी.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply